सोलापूर जिल्ह्यातील (Solapur) शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आगामी खरीप व रब्बी हंगामासाठी (Kharip & Rabbi Season) सुमारे चार हजार दोनशे कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप होणार असल्याचे सांगितले जात आहे.
तसं बघायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर हा जिल्हा रब्बी हंगामात सर्वाधिक पिकांची लागवड करत असतो मात्र असे असतानाही या जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कर्जाची मागणी ही दिवसेंदिवस वाढत आहे. याच गोष्टीचा विचार करता यंदा खरीप व रब्बी हंगामासाठी समान स्वरूपात कर्जाचे वाटप केले जाणार आहे.
सोलापूर हा रब्बीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पश्चिम महाराष्ट्रातील हा जिल्हा सर्वाधिक साखर कारखाने (Most sugar factories) असण्याचा मान आपल्या शिरेपेचात ठेवतो. असे असतानाही गेल्या काही वर्षापासून या जिल्ह्यात खरीप हंगामातील क्षेत्र हे वाढत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांच्या मार्फत जवळपास साडेतीन हजार कोटींचे कर्ज वाटप केले जाते.
मात्र, दिवसेंदिवस शेतकऱ्यांकडून कर्जाची मागणी वाढत असल्याने नाबार्डच्या सर्वेनुसार आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चार हजार दोनशे कोटी रुपये पीककर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. या महिन्या अखेरनंतर अर्थात नवीन आर्थिक वर्षात मागेल त्या शेतकऱ्याला कर्ज या धोरणाचा अवलंब करीत कर्ज वाटप केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, असे असले तरी ज्या शेतकऱ्यांचा सिबिल स्कोर उत्तम आहे त्यांना कर्ज देण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर 650 च्या आसपास असणे महत्त्वाचे आहे. कर्ज घेण्यासाठी सिबिल स्कोर चांगला असावा तसेच संबंधित शेतकरी इतर कोणत्याच बँकेचा थकबाकीदार नसावा हे निकष लावून देण्यात आले आहेत.
यंदा शेतकऱ्यांना प्रत्येक पिकासाठी नेहमीपेक्षा वाढीव कर्ज देण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत राज्य सहकारी बँकेला बँकांनी प्रस्ताव देखील पाठवला आहे. आता राज्य सहकारी बँकेच्या गाईडलाईन्स नुसार कर्जाचे वाटप सुरू होणार आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल साडेचारशे कोटी अधिक कर्जाचे वाटप करणार असल्याचे समजत आहे. याव्यतिरिक्त शेतकरी बांधवांना तीन लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देखील बँका उपलब्ध करून देणार आहेत. यामुळे शेतकरी बांधवांना निश्चितच फायदा होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी थोड्याफार प्रमाणात का होईना आता सुखावल्याचे चित्र बघायला मिळेल.