Maharashtra News : केंद्र शासनाच्या माध्यमातून देशात सध्या वेगवेगळी विकासाची कामे केली जात आहे. तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी देखील केंद्रातील मोदी सरकारने वेगवेगळ्या योजना आखल्या आहेत.
यंदाच्या अर्थसंकल्पात पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रम पर्वतमाला’ ही योजना देखील सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत देशभरातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांवर रोपवे देखील तयार केले जात आहेत.
दरम्यान केंद्र शासन महाराष्ट्रातील चार महत्त्वाच्या पर्यटन स्थळांवर रोपवे विकसित करणार असल्याची माहिती एका मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड (NHLML) या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत काम करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील चार ठिकाणी रोपवे तयार केले जाणार आहेत.
विशेष बाब म्हणजे यासाठी जवळपास 1000 कोटीपेक्षा अधिक रक्कम खर्च केली जाणार आहे. निश्चितच पर्यटन स्थळावर रोपवे तयार झाले तर पर्यटकांची गर्दी वाढणार आहे, पर्यटकांना सुविधा उपलब्ध होतील आणि यामुळे पर्यटन क्षेत्र लाभान्वित होईल अशी आशा व्यक्त होत आहे. आता आपण महाराष्ट्रातील कोणत्या चार ठिकाणी रोपवे तयार होणार आहेत यात विषयी जाणून घेऊया.
राज्यात या ठिकाणी तयार होणार रोपवे
हाती आलेल्या माहितीनुसार, केंद्र शासनाच्या माध्यमातून नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेडकडून नासिक मधील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी ते अंजनेरी यादरम्यान 5.8 किलोमीटर लांबीचा रोपवे तयार केला जाणार आहे.
तसेच पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ल्यावर देखील १.४ किलोमीटर लांबीचा रोपवे बांधला जाणार आहे. यासोबतच रायगड जिल्ह्यातील रायगड किल्ला, महाड येथे १.४ किलोमीटर लांबीचा आणि माथेरान हिल स्टेशन येथे ५ किलोमीटर लांबीचा रोपवे तयार करण्याची योजना आहे.
विशेष बाब म्हणजे या ठिकाणांपैकी ब्रह्मगिरी ते अंजनेरी दरम्यान सर्वप्रथम रोपवे तयार केले जाणार आहे. उर्वरित ठिकाणी देखील लवकरच रोपवे तयार करण्याचे नियोजन आहे.