Vande Bharat Express : सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात वंदे भारत एक्सप्रेस बाबत फारच चर्चा रंगत आहेत. ही गाडी खरतर चार वर्षांपूर्वी सुरू झाली. मात्र या चार वर्षाच्या काळातच या गाडीची लोकप्रियता राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेसच्या तुलनेत खूपच अधिक भासत आहे. रेल्वे प्रवासी शताब्दी आणि राजधानीपेक्षा वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास अधिक सुरक्षित, गतिमान असल्याचा आणि आरामदायी असल्याच मत व्यक्त करत आहेत.
हेच कारण आहे की रेल्वे प्रवाशांची पसंती पाहता आता देशातील विविध मार्गावर ही गाडी चालवण्याचा प्रयत्न भारतीय रेल्वेच्या माध्यमातून होत आहे. आतापर्यंत देशातील एकूण 25 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू झाली आहे. विशेष बाब अशी की, यातील पाच मार्ग हे महाराष्ट्रातील आहेत. म्हणजेच आपल्या राज्याला आतापर्यंत पाच वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे. दरम्यान महाराष्ट्रासाठी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून आणखी एक गोड बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे राज्यात आणखी तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असा अंदाज आहे. या तीनही गाड्या नागपूरहुन धावणार आहेत. याबाबत एका प्रतिष्ठित वृत्त संस्थेमध्ये महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. सदर वृत्त संस्थेमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या वृत्तानुसार, भारतीय रेल्वेचे नागपूरहून तीन महत्त्वाच्या शहरांदरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचे विचाराधीन आहे.
नागपूर ते पुणे, नागपूर ते भोपाळ आणि नागपूर ते हैदराबाद या तीन मार्गावर ही गाडी चालवली जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, नुकताच या तिन्ही मार्गावरील वाहतूक सर्वे रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाने हा वाहतूक सर्वे करण्याचे प्रशासनाला कळवले होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या माध्यमातून हा सर्वे करण्यात आला आहे. मात्र हा सर्वे वंदे भारत एक्सप्रेस गाडी चालवण्यासाठी करण्यात आला आहे की इतर रेल्वे गाड्या चालवण्यासाठी करण्यात आला आहे?
असा प्रश्न रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विचारला असता त्यांनी हा सर्वे वंदे भारत एक्सप्रेस आणि इतर रेल्वे गाड्यांसाठी देखील आहे असे सांगितले आहे. दरम्यान अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करायची की इतर रेल्वे गाडी सुरु करायची याबाबतचा निर्णय रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून घेतला जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. एकंदरीत अद्याप या तीन मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार की अन्य रेल्वे गाडी याबाबत निर्णय झालेला नाही.
मात्र, या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली तर संबंधित मार्गावरील रेल्वे प्रवाशांचा प्रवास गतिमान होणार आहे. दरम्यान, केंद्र शासनाच्या माध्यमातून आगामी वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पाहता विविध मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवल्या जात आहेत, यामुळे या मार्गावर देखील वंदे भारत एक्सप्रेसच चालवली जाऊ शकते असा अंदाज आहे.