कापूस हे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये लागवड केली जाते. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश मध्ये कापसाची लागवड सर्वाधिक होते. गुजरात मधीलही जवळपास 11 जिल्ह्यांमध्ये कापसाची शेती केली जाते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कापसाचे पीक शेतकऱ्यांसाठी थोडेसे त्रासदायक ठरू लागले आहे. कारण की, गेल्या दोन वर्षांपासून बाजारात कापसाला अपेक्षित भाव मिळत नाही.
गेल्या वर्षी महाराष्ट्रात आणि गुजरात मध्ये कापसाला खूपच नगण्य भाव मिळाला होता आणि यामुळे तेथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हेच कारण आहे की यावर्षी राज्यासहित गुजरात मध्ये कापूस लागवडीखालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. यावर्षी गुजरात मध्ये कापसाच्या ऐवजी इतर तेलबिया पिकांच्या लागवडीला शेतकऱ्यांनी पसंती दाखवली आहे.
यावर्षी गुजरात मध्ये भुईमूगसह इतर तेलबिया पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही वर्षांपासून गुजरात राज्यात तेलबिया पिकांची लागवड वाढत आहे आणि कापसाची लागवड हळूहळू घटत चालली आहे. यावर्षी देखील गुजरात मध्ये कापसाची लागवड कमी झाली आहे. दुसरीकडे यंदा भुईमूग लागवड वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 22 जुलै 2024 पर्यंत गुजरात राज्यात 18.28 लाख हेक्टर क्षेत्रावर भुईमुगाची लागवड करण्यात आली आहे. गेल्यावर्षी अर्थातच 2023 मध्ये याच कालावधीत गुजरात राज्यात 16 लाख हेक्टर क्षेत्रावर भुईमूग लागवड करण्यात आली होती. म्हणजेच यंदा भुईमुगाची लागवड दोन लाख हेक्टर क्षेत्राने वाढली आहे. तसेच कापसाबाबत बोलायचं झालं तर कापसाची लागवड गेल्यावर्षी या कालावधीपर्यंत 26 लाख हेक्टर क्षेत्रावर झाली होती.
यंदा मात्र बावीस लाख हेक्टर क्षत्रावर झाली आहे. म्हणजे याची लागवड चार लाख हेक्टर क्षेत्राने कमी झाली आहे. गेल्या तीन वर्षांच्या सरासरी पेक्षा यंदा गुजरात मध्ये कापसाची लागवड कमी झाली आहे. दरम्यान, बाजार अभ्यासाकांनी यंदा कापसाची लागवड कमी झाली असल्याने बाजारात कापसाला चांगला समाधानकारक भाव मिळणार अशी आशा व्यक्त केली आहे.