Goat Rearing : भारतात फार पूर्वीपासून शेती समवेतच पशुपालनाचा देखील व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात आहे. पशुपालनाचा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. शेतकरी बांधव शेतीला जोडधंदा म्हणून गाय, म्हैस, वराह, शेळी, मेंढी या प्राण्यांचे संगोपन करत आहेत. विशेष म्हणजे पशुपालनातून शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील होत आहे.
शेळीपालना बाबत बोलायचं झालं तर शेळीपालनाचा व्यवसाय महाराष्ट्रासहित देशातील विविध राज्यांमधील ग्रामीण भागाचा अर्थव्यवस्थेचा कणा बनला आहे. शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी खूपच कमी भांडवल लागते शिवाय कमी जागेत हा व्यवसाय सुरू करता येतो.
शेळीला गरीबाची गाय म्हणून ओळखले जाते. पण, शेळीपालन व्यवसायातून चांगली कमाई करायची असेल तर शेळीच्या चांगल्या सुधारित जातींचे संगोपन करणे आवश्यक राहते.
अशा परिस्थितीत आज आपण शेळीच्या अशा एका सुधारित जातीची माहिती जाणून घेणार आहोत ज्या जातीच्या शेळीपालनातून शेतकऱ्यांना लाखो रुपयांची कमाई होणार आहे. अफ्रीकन बोअर ही शेळीची एक सुधारित जात आहे.
या जातीचे पालन करून शेतकरी बांधव चांगले दर्जेदार बोकड तयार करू शकतात. या जातीच्या बोकडांना बाजारात मोठी मागणी असते. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे या जातीच्या शेळीचे मांस हे 3000 ते 3500 रुपये प्रति किलो यादरम्यान विकले जाते.
याच्या मांसाची मागणी विदेशात देखील आहे. आफ्रिकन बोअर शेळी वजनामुळे देखील खूप लोकप्रिय आहे. या जातीच्या प्रौढ बोकडाचे वजन 110 ते 135 किलो असते, तर मादी शेळीचे वजन 90 ते 100 किलो असते.
बोकडाची लांबी 70 सेमी पर्यंत असते आणि मादी शेळीची लांबी 50 सेमी पर्यंत असते. या जातीच्या शेळीची कातडी पांढरी असते, डोके व मान लाल असते आणि कान खालच्या दिशेने लटकलेले असतात.
या जातीच्या शेळीचे संगोपन भारतातील अनेक भागांमध्ये होत आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील या जातीच्या शेळीचे पालन करून शेतकरी चांगली कमाई करत आहेत. महाराष्ट्रातील सांगली, पुणे, कोल्हापूर येथे या जातीची शेळी मोठ्या प्रमाणात आढळते.
म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातील हवामान या जातीच्या शेळीस अनुकूल आहे. यामुळे राज्यातील शेतकरी बांधव शेतीला जोडधंदा म्हणून या जातीच्या शेळीचे संगोपन करून चांगली कमाई करू शकणार आहेत.