Gairan Land : गेल्या काही महिन्यांपासून गायरान जमिनी बाबत महाराष्ट्रात मोठे वादंग पेटलेले आहे. गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यावरून राज्यात मोठे वाद-विवाद सुरू होते. अशा परिस्थितीत अनेकांच्या माध्यमातून गायरान जमीन नावावर होत असते का असा सवाल उपस्थित केला जात होता? दरम्यान आज आपण गायरान जमिनी बाबतच्या याच प्रश्नाचे अगदी थोडक्यात उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आज आपण गायरान जमीन म्हणजे नेमकी काय आणि गायरान जमीन एखाद्या व्यक्तीच्या नावावर होऊ शकते का ? याविषयी थोडक्यात पण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.
गायरान जमीन म्हणजे काय ?
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 12 अन्वये, गावातील भोगवट्यात नसलेल्या जमिनी, वनासाठी, राखीव जळणासाठी, गावातील गुराढोरांकरिता मोफत कुरणासाठी, राखीव गवतासाठी, वैरणीसाठी, दहनभूमीसाठी किंवा दफनभूमीसाठी, गावठाणासाठी, छावणीसाठी, मळणीसाठी, बाजारासाठी, कातडी कमवण्यासाठी, रस्ते, बोळ, उद्याने, गटारे, यांसारख्या कोणत्याही सार्वजनिक कारणासाठी वेगळे ठेवल्या जातात.
अशा जमिनीपैकी मोफत कुरणासाठी, गवतासाठी किंवा वैरणीसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जमिनीला ‘गायरान जमीन’ अस म्हटलं जातं.
म्हणजेच आपल्या गावाच्या अवतीभोवती असलेल्या सार्वजनिक वापराकरिता ग्रामपंचायत किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ताब्यात असलेली जमीन म्हणजेच गायरान जमीन.
या जमिनीचा ताबा हा ग्रामपंचायतीकडे असला तरी देखील याची मालकी ही शासनाची असते. दरम्यान आता आपण ही गायरान जमीन खाजगी व्यक्तीच्या नावावर होऊ शकते का याबाबत तज्ञांनी काय माहिती दिली आहे हे पाहणार आहोत.
गायरान जमीन नावावर होते का
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार गायरान जमीन कोणाच्याच नावावर होऊ शकत नाही. अशा जमिनीचे मालक हे शासन स्वतः असते.
गायरान जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर शासन असा उल्लेख असतो यामुळे ही जमीन कोणाच्याच नावावर होऊ शकत नाही.
दुसरीकडे गायरान जमिनीच्या वापराकरिता किंवा हस्तांतरण करण्याकरिता संबंधित जिल्हाधिकारी महोदयाची पूर्वपरवानगी आवश्यक असते. एकंदरीत गायरान जमीन ही शासनाच्या मालकीची असते आणि यावर ग्रामपंचायतीचा ताबा असतो.
तसेच ही जमीन कोणाच्याच नावावर होऊ शकत नाही. या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर शासनाच्या मालकीचा उल्लेख असतो.