Cow Rearing : भारतात शेती हा एक प्रमुख व्यवसाय आहे. राज्यातील जवळपास 50 ते 60 टक्के जनसंख्येचे शेती हे एक प्रमुख उदरनिर्वाहाचे साधन आहे. शेती सोबतच आपल्या देशात शेती पूरक व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात केले जात आहेत.
शेतीपूरक व्यवसायांमध्ये पशुपालन या व्यवसायाचा देखील समावेश होतो. पशुपालन व्यवसाय प्रामुख्याने दुग्ध उत्पादनासाठी केले जातात. या व्यवसायांतर्गत गाईंचे मोठ्या प्रमाणात संगोपन केले जात आहे. गाईचे संगोपन विशेषता दुग्धोत्पादनासाठी केले जाते.
अशा परिस्थितीत या व्यवसायातून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी सुधारित आणि दुधाच्या उच्च उत्पादन देणाऱ्या गाईंचे संगोपन करणे अतिशय आवश्यक बाब ठरते. यामुळे आज आपण गाईच्या अशा काही सुधारित जाती जाणून घेणार आहोत ज्या दिवसाकाठी 15 लिटर पर्यंतचे दूध उत्पादन देण्यास सक्षम आहेत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया उच्च दूध उत्पादन देणाऱ्या गाईच्या काही प्रमुख सुधारित जाती.
गिर गाय : गाईची ही एक सुधारित जात आहे. या जातीचे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात संगोपन केले जात आहे. राज्यातील हवामान या जातीच्या गाईला विशेष मानवते. खरंतर, या जातीच्या गाईचे गुजरात मधील गिर जंगल हे उगमस्थान आहे. याच जंगलावरून या जातीच्या गायींना गिर असे नाव पडले आहे.
ही गाय दिवसासाठी 12 ते 15 लिटर पर्यंत दूध देते. विशेष म्हणजे या गाईचे दूध बाजारात महाग विकले जाते. या गायीच्या दुधाला बाजारात 60 ते 65 रुपये प्रति लिटर एवढा दर मिळतो. विशेष म्हणजे या गाईच्या दुधात असणारे पोषक घटक मानवी आरोग्याला विशेष लाभ प्रत ठरतात. यामुळे या गायीच्या दुधाला बाजारात नेहमीच मागणी असते. जर तुम्हीही गाय पालन करू इच्छित असाल तर या गाईचे संगोपन तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
लाल सिंधी गाय : लाल सिंधी गाय ही देखील गाईची एक प्रमुख जात आहे. या जातीचे भारतात मोठ्या प्रमाणात संगोपन केले जात आहे. ही जात दिवसाकाठी दहा ते बारा लिटर पर्यंतचे दूध देण्यास सक्षम आहे. विशेष बाब अशी की, या गाईच्या दुधातही अनेक पोषक घटक आढळतात.
यामुळे या गायीच्या दुधाचे सेवन मानवी आरोग्याला फायदेशीर ठरते. म्हणून याही जातीच्या गायीचे दूध बाजारात चढ्या भावात विकले जाते. या गाईच्या दुधात फॅट अधिक असतो. म्हणून दुग्धोत्पादक शेतकऱ्यांसाठी या जातीच्या गाईचे संगोपन फायदेशीर ठरू शकते.
साहिवाल गाय : ही देखील गाईची एक सुधारित जात आहे. अलीकडे महाराष्ट्रातील पशुपालक शेतकरी बांधव या गाईचे मोठ्या प्रमाणात संगोपन करू लागले आहेत. आपल्या राज्यातच नाही तर देशातील विविध राज्यांमध्ये या गाईचे संगोपन केले जाऊ लागले आहे.
ही जात गिर गाई सारखीच उच्च दूध उत्पादन देणारी आहे. या जातीच्या गाईपासून दिवसाला 15 ते 20 लिटर पर्यंतचे दूध मिळते. यामुळे जर तुम्हीही गाय पालन करू इच्छित असाल तर तुम्ही या गायीचे संगोपन करून चांगले उत्पादन मिळवू शकणार आहात.