PM Modi :भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषिप्रधान देशाचा बळीराजा एक कणा आहे. मात्र, हाच बळीराजा आपल्या देशात शेतीसाठी आवश्यक वीज मिळावी म्हणून नऊ वर्षापासून पायपीट करतोय, तरीदेखील या शेतकऱ्याला अजून वीज जोडणी देण्यात आलेली नाही. वीज जोडणी मिळत नाही म्हणुन त्रस्त झालेल्या या शेतकऱ्याने अखेर पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवले आहे. शेतीप्रधान देशात शेतकऱ्यालाच वीज मिळत नाही म्हणून थेट पंतप्रधान यांना पत्र लिहावे लागत असेल तर ही निश्चितच लाजिरवाणी बाब आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याच्या घायगाव येथील कृष्णा रुस्तुम धने यांना 9 वर्षांपासून वीज मिळत नसल्याने पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले आहे. कृष्णा एक अल्पभूधारक शेतकरी आहेत. कृष्णा यांना 2008 मध्ये शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर खोदता आली. विहीर खोदली तिला भरपूर पाणी लागले म्हणून पाण्याचा उपसा केल्याशिवाय विहिरीचे पुढील खोदकाम करता येणे अशक्य झाले
गटविकास अधिकाऱ्यांनी कृष्णा यांना विद्युत पुरवठा दिला जावा याबाबत जून 2013 मध्ये कन्नड च्या कार्यकारी अभियंतेस पत्र देखील लिहिले. वीजपुरवठा मिळावा म्हणून कृष्णा यांनी जुलै 2013 मध्ये पाच हजार तीनशे रुपये कोटेशन रक्कम देखील महावितरण कडे जमा केली. कोटेशन रक्कम जमा करून आता जवळपास 9 वर्षे उलटली मात्र अद्यापही कृष्णा यांना वीजपुरवठा देण्यात आलेला नाही.
9 वर्षांपासून वीज जोडणी दिली नसल्याने कृष्णा यांना विहिरी तुडुंब भरली असता देखील त्या पाण्याचा शेतीसाठी वापर करता येत नाही. यामुळे या शेतकरी राजावर दुसऱ्याच्या शेतात मजुरी करण्याची नामुष्की ओढावली आहे. एकीकडे शासन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे सांगत आहे, तर दुसरीकडे देशात शेतकरी बांधव शेतीसाठी आवश्यक विज जोडणी साठी तब्बल नऊ वर्षांपासून प्रतीक्षेत आहेत.
यामुळे शासनाच्या धोरणावर यावेळी एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. शासन फक्त निवडणुकीच्या तोंडावर मन मोहित वायदे करत असते मात्र, बांधावरची परिस्थिती पूर्णतः भिन्न आहे. त्यामुळे शासनाचे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न हे केवळ पांढऱ्या कागदावरच मर्यादित आहे प्रत्यक्षात मात्र त्यासाठी कुठलीच उपाययोजना केली जात नसल्याचे आता स्पष्ट होत आहे.
कृष्णा नऊ वर्षांपासून वीज जोडणी मिळावी म्हणून रोजाना महावितरणच्या कार्यालयात हजेरी लावली आहे. मात्र सलग नऊ वर्षे उंबरठे झिजवून देखील या शेतकऱ्याला वीज जोडणी दिली गेली नाही. एवढेच नाही चोर तर चोर वरून शिरजोर या म्हणीप्रमाणे एका अधिकाऱ्याने तर कृष्णा यांना चक धमकी दिली की तू आता तक्रार करू नको.
या धमकीमुळे संतप्त झालेल्या कृष्णा यांनी थेट देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात अल्पभूधारक शेतकरी कृष्णा यांनी मला आपल्याकडून न्यायाची अपेक्षा आहे असे नमूद केले आहे. कृष्णा यांनी सांगितले की, मी वीज जोडणीसाठी सुमारे नऊ वर्षे प्रतीक्षेरत आहे तरीदेखील मला महावितरणकडून वीज दिली गेलेली नाही.
त्यामुळे मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. कृष्णा यांनी पुढे बोलताना सांगितले की, आगामी 90 दिवसात जर मला वीज जोडणी करून देण्यात आली नाही तर मी वैजापूर महावितरण कार्यालयासमोर आत्महत्या करेल. एकंदरीत अल्पभूधारक शेतकरी कृष्णा यांच्या समवेत घडलेली ही घटना कृषिप्रधान देशासाठी काळीमा फासणारी आहे.