Farmer Success Story : सुयोग्य नियोजन आणि जिद्दीने जर शेतीचा व्यवसाय केला तर यातून चांगली कमाई होते. योग्य नियोजनामुळे कमी शेतजमिनीतूनही चांगले लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले जाऊ शकते. कधीकधी अगदी 18 गुंठ्यात म्हणजेच अर्धा एकर पेक्षा कमी जमिनीतूनही सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले जाऊ शकते.
विशेष म्हणजे हे उत्पन्न फक्त आंतरपिकातून मिळवता येऊ शकते. कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही परंतु सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील प्रयोगशील महिला शेतकऱ्यांनी हे शक्य करून दाखवले आहे.
शिराळा तालुक्यातील राजश्री वसंतराव पाटील या महिला शेतकऱ्याने आंतरपिकाचा प्रयोग करून ही किमया साधली आहे. या कामी या महिला शेतकऱ्याला त्यांच्या दोन्ही मुलांनी मोठी मदत केली आहे.
राजश्री पाटील यांनी आपली मुलं सुनील व बाबू यांच्या मदतीने उसाच्या पिकात आंतरपीक म्हणून वांग्याची लागवड केली आणि अवघ्या काही महिन्याच्या काळातच फक्त 18 गुंठे जमिनीतून सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सप्टेंबर 2023 मध्ये उसाची लागवड केली. ऊस लागवड केल्यानंतर अवघ्या दहा दिवसात त्यांनी उसाच्या पिकात आंतरपीक म्हणून वांग्याची लागवड केली.
त्यांनी त्रिशूला या जातीच्या वांग्याची लागवड केली. वांगी लागवड केल्यानंतर योग्य नियोजन केले. वांग्याच्या पिकाला चांगली पोषक घटक मिळावीत यासाठी गावखताचा वापर केला गेला.
त्यामुळे वांग्याचे पीक चांगले जोमदार आले आणि त्यांना यातून चांगले विक्रमी उत्पादन मिळत आहे. दिवसाला 60 ते 70 किलो वांगी त्यांना मिळत असून गेल्या दोन महिन्याच्या काळात त्यांनी वांग्याच्या या 18 गुंठ्याच्या प्लॉटमधून अडीच टन माल काढला आहे.
यातून त्यांना आज अखेर सव्वा लाख रुपयांच उत्पन्न मिळाल आहे. विशेष बाब अशी की आणखी दोन महिने त्यांना या प्लॉटमधून उत्पन्न मिळत राहणार आहे. म्हणजेच उत्पन्नाचा हा आकडा आणखी वाढणार आहे.
निश्चितच शेतीमध्ये राजश्री पाटील यांनी केलेली ही कामगिरी इतरांसाठी देखील मोठी प्रेरणा देणारी ठरणार आहे. इतर प्रयोगशील शेतकऱ्यांना देखील यातून आदर्श घेता येणार आहे.
जर काळाच्या ओघात बदल केला आणि असा आंतरपिकाचा प्रयोग केला तर मुख्य पिकाच्या आधीच आंतरपिकातून चांगले उत्पन्न मिळू शकते हेच या प्रयोगातून सिद्ध होत आहे.