Farmer Success Story : गेल्या काही वर्षांपासून शेतीचा व्यवसाय खूपच रिस्की बनला आहे. शेतीमध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागतोय. अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, ढगाळ हवामान, दुष्काळ अशा नानाविध संकटांमुळे शेतकरी राजा भरडला जात आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला बाजारात अपेक्षित भाव मिळत नाही.
सध्या सोयाबीन आणि कापूस या पिकाबाबत तरी तसेच पाहायला मिळतंय. सोयाबीनला आणि कापसाला हंगाम सुरू झाल्यापासून समाधानकारक बाजारभाव मिळत नाहीये. यामुळे शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता आलेला नाही.
अशा या विपरीत परिस्थितीमध्ये मात्र मराठवाडा विभागातून एक मोठ पॉझिटिव्ह उदाहरण समोर येत आहे. मराठवाड्यातील एका शेतकऱ्याने मनासारखा बाजार भाव नसतानाही टरबूज या हंगामी पिकातून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे.
उन्हाळी हंगामात लावलेल्या टरबूज पिकातून मराठवाड्यातील शेतकऱ्याने एकरी अडीच लाख रुपयांचा नफा मिळवला असून यामुळे सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याची संपूर्ण राज्यभर चर्चा पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्याचे मौजे छोटीवाडी येथील अशोक भांगे यांनी ही किमया साधली आहे. खरेतर गेल्या पावसाळ्यात महाराष्ट्रात खूपच कमी पावसाची नोंद करण्यात आली.
यामुळे अनेक भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात दुष्काळाची झळ अधिक पाहायला मिळतेय. मात्र असे असतानाही, दुष्काळी परिस्थितीत आपल्याजवळील पाण्याचे योग्य नियोजन करून अशोक भांगे यांनी टरबूज पीक लागवडीतून लाखो रुपयांची कमाई केली आहे.
अशोक यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी जानेवारी महिन्यात शेवटच्या आठवड्यामध्ये टरबूज लागवड केली. टरबूज लागवड करण्यासाठी त्यांनी मल्चिंग पेपरचा वापर केला तसेच पाण्यासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केला.
त्यांनी आपल्या एक एकर जमिनीत हायब्रीड बियाण्याचा वापर करून टरबूजची लागवड केली. विशेष म्हणजे पीक लागवडीनंतर अवघ्या सव्वा दोन महिन्यांच्या कालावधीत त्यांना यातून उत्पादन मिळाले.
टरबूज पिकातून त्यांनी एकरी अडीचशे क्विंटलचे दर्जेदार उत्पादन मिळाले असून यातून त्यांना अडीच लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. म्हणजेच क्विंटलला 1 हजार रुपयाचा भाव त्यांना मिळाला.
जर पिकाला चांगला भाव राहिला असता तर कमाईचा आकडा आणखी वाढला असता. मात्र कमी बाजार भाव असतानाही विक्रमी उत्पादन मिळाले असल्यामुळे त्यांना चांगली कमाई झाली आहे.