Farmer Success Story : गेल्या काही वर्षांपासून शेतीचा व्यवसाय हा मोठा आव्हानात्मक बनला आहे. कधी अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट तर कधी दुष्काळ अशा असंख्य संकटांमुळे शेतीमधून अपेक्षित उत्पादन मिळत नाहीये. काही वेळा शेतीमधून या विविध नैसर्गिक संकटांचा सामना करून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते मात्र उत्पादित केलेल्या शेतमालाला बाजारात फारसा भाव मिळत नाही.
यामुळे सातत्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो. मात्र तरीही शेतकरी बांधव खचत नाहीत. शेती करणं सोडत नाहीत. शेतीमध्ये अपयश आले तरी देखील नवनवीन प्रयोग सुरूच ठेवतात. याच कारणाने शेतकऱ्यांना शेतीमधून काही प्रसंगी खूपच चांगले उत्पन्न मिळते.
अपार कष्ट, जिद्द, चिकाटी आणि कामांमध्ये सातत्य ठेवून शेतकरी बांधव शेतीमधून दोन-तीन वर्षाआड चांगली कमाई काढतात. आपल्या मेहनतीच्या आणि जनतेच्या जोरावर शेतकऱ्यांना काही प्रसंगी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते.
असेच एक उत्तम उदाहरण समोर आले आहे ते आपल्या मराठवाड्यातून. मराठवाड्यातील एका शेतकऱ्याने चक्क दहा महिन्यांच्या काळात 75 लाखांची कमाई केली आहे. पाच एकर शेत जमिनीत अद्रक पिकाची लागवड करून या शेतकऱ्याने लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे.
यामुळे सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याची चर्चा रंगली आहे. मराठवाड्यातील फुलंब्री येथील प्रयोगशील शेतकरी संतोष दत्तात्रेय नागरे यांनी ही किमया साधली आहे. संतोष यांना आणखी एक भाऊ आहे. या दोघा भावांना एकूण 20 एकर जमीन आहे.
संतोष सांगतात की त्यांचे वडील हे पारंपारिक शेती करायचे. मात्र यातून त्यांना फारसे उत्पन्न मिळत नसत. यामुळे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या संतोष यांनी शेतीमध्ये मोठा बदल करावा लागेल हे ओळखले. या अनुषंगाने त्यांनी पीक पद्धतीत बदल करण्याचे ठरवले.
त्यांनी पपई, ऊस, चक्की अशा पिकांची लागवड केली. यातून त्यांना चांगली कमाई झाली आणि यामुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढला. पुढे मग त्यांनी 2023 मध्ये अद्रक शेतीचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी जून महिन्यात त्यांनी पाच एकर जमिनीत अद्रक ची लागवड केली.
या पिकातून त्यांना एप्रिल 2024 अखेरपर्यंत 750 क्विंटल अद्रक चे उत्पादन झाले. म्हणजे एका एकरातून जवळपास दीडशे एकर एवढे विक्रमी उत्पादन त्यांनी घेतले. अद्रक ला दहा हजार रुपयांचा विक्रमी दरही मिळाला. अशा तऱ्हेने त्यांना या पाच एकर जमिनीतून तब्बल 75 लाख रुपयांची कमाई झाली.
संतोष सांगतात की त्यांच्याकडे अद्रक चे उत्कृष्ट बियाणे असल्याची माहिती पंचक्रोशीत पसरली आणि सातारा येथीलच तब्बल 500 शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून 500 क्विंटल अद्रक बियाणे खरेदी केले. यातून त्यांना 50 लाख रुपये मिळालेत. उर्वरित 250 क्विंटल अद्रक त्यांनी दहा हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे विकले. यातून त्यांना 25 लाख मिळाले आहेत.
या पिकासाठी त्यांनी 12 लाख रुपयांचा खर्च केला आहे. म्हणजे खर्च वजा करता त्यांना तब्बल 63 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. एकंदरीत शेतीमध्ये जिद्द आणि चिकाटी ठेवली, सातत्याने शेती व्यवसायात गरजेनुसार बदल केला तर लाखोंची कमाई होऊ शकते हेच त्यांच्या या उदाहरणावरून अधोरेखित होत आहे.