Farmer Success Story : तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची, गड्या तयारी ठेव मनाची, कधी झुकायची कधी नडायची, दुनिया डोक्यावर घेणार हाय र, तुला उचलून घेणार हाय र…..! ही कविता तुम्ही अनेकदा ऐकली असेल. दरम्यान, या कवितेला साजेस अस आणि उत्तम उदाहरण समोर आल आहे.
धाराशिव जिल्ह्यातील एका पायाने अधू असलेल्या तरुणाने अपंग असताना देखील शेती व्यवसायात चमत्कार घडवून दाखवला आहे. कोरोना काळात नोकरी गेल्यानंतर गावी परतलेल्या एका पायाने अपंग तरुणाने शेतीमधून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. या तरुणाने केळीची बाग फुलवून लाखोंचे उत्पन्न कमावले आहे.
आधुनिक पद्धतीने शेती केली तर शेती व्यवसाय देखील आर्थिक सुबत्ता मिळवून देऊ शकतो हेच या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मौजे एकुरका येथील अमोल राजाभाऊ यादव या तरुणाने ही किमया साधली आहे. यामुळे सध्या अमोल भाऊंची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.
या तरुणाने अपंग असतानाही शेतीमध्ये आधुनिक पद्धतीचा प्रयोग राबवून केळीच्या शेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न कमावले असल्याने या युवकावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. अमोल एका पायाने अपंग आहेत. त्यांनी जेमतेम नववीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बरेच दिवस पुण्यातील एका कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम केले.
मात्र कोरोनाने त्यांच्या आयुष्यात एक मोठा टर्निंग पॉईंट आणला. कोरोनामुळे त्यांची नोकरी गेली आणि त्यांना गावी परतावे लागले. गावी परतल्यानंतर काय करावे हाच पहिला प्रश्न त्यांच्यापुढे होता. मात्र नोकरी गेल्यानंतरही न डगमगता त्यांनी मोठ्या हिमतीने घरच्यांसोबत पुढे काय करायचे याविषयी चर्चा केली. यानंतर त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला.
नोकरी गेली म्हणून खचून न जाता त्यांनी पूर्णवेळ शेती करण्याचा मोठा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी दीड एकर जमिनीत केळीची बाग लावली. केळी लागवड केल्यानंतर मध्यंतरी त्यांना पाण्यासाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागली. त्यांनी टँकरने पाणी वाहून पिक वाचवले. दरम्यान अमोल यांची ही मेहनत आता फळाला आली आहे.
त्यांनी उत्पादित केलेली केळी दुबई आणि इराकच्या बाजारात विक्रीसाठी गेल्या आहेत. यामुळे त्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष बाब अशी की केळीच्या पिकात आंतरपीक म्हणून कोबी देखील लावली होती आणि त्यातूनही त्यांना चांगला अतिरिक्त नफा मिळाला आहे.
खरंतर अमोल यांचे कुटुंबीय आधी पारंपारिक पद्धतीने शेती करायचे. परंतु अमोल यांनी पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी आधुनिक पद्धतीने केळीची बाग फुलवण्याचा निर्णय घेतला. आणि हाच निर्णय आज त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला असून त्यांना आता शेतीमधून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.