Farmer succes story : कोणत्याही क्षेत्रात यशाला गवसणी घालण्यासाठी गरज असते ती अपार कष्टाची आणि योग्य नियोजनाची.
कष्टाला योग्य नियोजनाची जर सांगड घातली गेली तर निश्चितच यशाला गवसणी घालता येणे शक्य होते मग ते क्षेत्र शेतीचे (Farming) का असेना.
राजस्थान मध्ये देखील असेच एक उत्तम उदाहरण समोर आले आहे. राजस्थान मधील शेतकरी (Farmer) पिता-पुत्राने वाळवंटी जमिनीत खजुरचे यशस्वी उत्पादन (Date Palm Farming) घेऊन सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे.
जैसलमेर सारख्या अति उष्ण प्रदेशात या पिता-पुत्रांनी खजुराची लागवड करून एका झाडापासून 50 हजारांची कमाई करण्याची किमया साधली आहे. यामुळे पिता-पुत्रांच्या या यशाचे सर्वत्र मोठे कौतुक केले जात आहे.
एका झाडापासून 50 हजाराचं उत्पन्न राजस्थानमधील जैसलमेरमधील शास्त्रीनगर गावात राहणारे पिता-पुत्र सध्या संपूर्ण राजस्थान मध्ये नव्हे नव्हे तर संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरत आहेत.
हे शेतकरी पिता-पुत्र हजारो शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत. या पिता पुत्राच्या जोडीने खजूर लागवडीत चांगले यश संपादन केले आहे. दोघांच्या यशातून स्थानिक शेतकरी प्रेरणा घेत आहेत.
या दोघांचा दावा आहे की, एका खजूरच्या झाडापासून त्यांना 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. रामसिंग विश्नोई आणि त्यांचा मुलगा संजय यांनी वाळवंटी जमिनीत खजूर शेतीच्या माध्यमातून लाखोंची कमाई करण्याची किमया साधली आहे.
खाऱ्या पाण्याचा वापर पाकिस्तानच्या सीमेवर शेतकरी रामसिंग विश्नोई यांची शेतजमीन आहे. यामुळे त्यांच्या शेतीला खारे पाणी उपलब्ध आहे.
रामसिंग सांगतात की, खारे पाणी खजुराच्या लागवडीत कोणताच अडथळा आणत नाही. व्यवस्थित देखभाल केल्यास सरासरी 30 ते 40 हजार आणि अगदी 50 हजार रुपयांपर्यंतच्या खजूरांची विक्री होऊ शकते.
रामसिंग विश्नोई यांनी राजस्थानमधील चक 24 पीडी येथे 16 एकरात खजुराची बाग लावली आहे. वाळवंटात 11 हजार खजुराची रोपे लावून स्मार्ट शेतीचा नमुना सादर करणाऱ्या रामसिंग विश्नोई यांच्या बागेत मेदजूल, खालस, बार्ही आणि खुनेजी या जातींचे खजूर पाहायला मिळतात.
खजूर लागवड करण्याच्या तीन पद्धती आहेत. खजुराची लागवड करण्यासाठी आॅफशूट म्हणजेच मोठ्या झाडाच्या मुळापासून तयार केलेली वनस्पती वापरली जाते.
ऑफशूट पद्धतीचे खजूरचे रोपं 1500 रुपयांना उपलब्ध होते. मात्र अनुदान प्राप्त झाल्यानंतर त्याची किंमत 375 रुपये होते. शेतकरी रामसिंग सांगतात की, रोप काढल्यानंतर 24 तासांच्या आत त्याची लागवड झाली पाहिजे.
ऑफशूट्स विश्वसनीय असल्याचे सांगून ते म्हणाले, दोन वर्षांत 400-500 ऑफशूट इतर शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यांनी त्यांच्या फार्महाऊसवर 400-500 रोपेही लावली आहेत. सर्वच झाडांमधून खजूर चांगल्या प्रमाणात मिळत आहे.
ऑफशूट व्यतिरिक्त, टिश्यू कल्चर किंवा बियाणे म्हणजे खजुराच्या बियापासून देखील रोपे लावली जाऊ शकतात. राजस्थानमध्ये टिश्यू कल्चरने तयार झालेली खजूरचे रोपं 3700 रुपयांना मिळते.
75 टक्के अनुदानानंतर एक रोप 826 रुपयांना मिळते. शेतकरी राम सिंह यांच्या मते, खजुराच्या प्रगत लागवडीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य रोपाची निवड.
टिश्यू कल्चर महाग आहे, सर्व शेतकऱ्यांना ते परवडणारे नाही. यामुळे ऑफशूट निवडले जाऊ शकते. ऑफशूट रोपापासून देखील चांगले उत्पादन घेता येते.
राम सिंग यांच्या पुत्राने सांगितले की, खजूरची मेडजुल वेराइटी इतर वरायटीपेक्षा अधिक फायदेशीर असून या जातीच्या खजूर पिकातून एका झाडापासून 50 हजारांपर्यंतचे उत्पादन सहजच मिळवले जाऊ शकते. निश्चितच या पितापुत्रांची ही भन्नाट जोडी इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारी आहे.