दादासाहेबांनी करून दाखवलं; एकेकाळी 4 हजार रुपयाची नोकरी करणाऱ्या अवलियाने उभी केली 2 कोटींची कंपनी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Dadasaheb Bhagat Success Story : अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हे उससे मिलाने में लग जाती है ! हा डायलॉग तुम्ही अनेकदा ऐकला असेल. पण आज आपण अशा एका अवलियाची यशोगाथा पाहणार आहोत ज्यांनी हे सत्यात उतरवून दाखवले आहे. खरंतर, खडतर परिस्थितीचे रडगाणे न गाता प्रतिकूल परिस्थितींवर मात केली तर निश्चितच यशाला गवसणी घालता येते.

मराठवाड्यातील बीड जिल्ह्याच्या एका तरुणाने देखील असेच काहीसे केले आहे. एकेकाळी टाटा मध्ये चार हजार रुपयात आणि इन्फोसिस मध्ये नऊ हजार रुपयात ऑफिस बॉय म्हणून नोकरी करणाऱ्या अवलियाने आज दोन कोटी रुपयांच्या कंपनीची उभारणी केली आहे. बीडचे दादासाहेब भगत यांनी ही किमया साधली आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

1994 मध्ये बीडच्या मागासवर्गीय भागात जन्मलेले भगत त्यांचे संपूर्ण कुटुंब ऊस तोडणी करण्यासाठी भटकंती करत असत. भगत सांगतात की, ते त्यांच्या आईच्या पोटात असतांना त्यांच्या आईने डोक्यावर उस वाहिला आहे. ते स्वतः देखील त्यांच्या वडिलांसोबत विहिरीच्या कामावर जायचे. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर दादासाहेबांनी पुण्यातून आयआयटीचे शिक्षण पूर्ण केले.

शिक्षणानंतर त्यांना नोकरीची गरज भासली म्हणून सर्वप्रथम त्यांनी टाटा या कंपनीत चार हजार रुपयांवर नोकरी सुरू केली. पण 4000 रुपयात त्यांचा खर्च भागत नसे यामुळे त्यांनी इन्फोसिस मध्ये 9,000 रुपयावर कामाला सुरुवात केली. इन्फोसिस मध्ये त्यांनी ऑफिस बॉय म्हणून काम सुरू केले. या कामादरम्यानच त्यांना सॉफ्टवेअरचे महत्त्व समजले.

यानंतर मग त्यांनी दिवसा काम आणि रात्री अभ्यास सुरू केला. त्यांनी ग्राफिक्स डिझाईनिंग आणि ॲनिमेशनचा कोर्स केला. यानंतर ते मुंबई येथे नोकरीसाठी गेले. त्यानंतर त्यांनी C++ आणि पायथँन या कंप्यूटर लैंग्वेज शिकल्या. डिझाईन आणि ग्राफिक्स कंपनीसोबत काम करताना त्यांनी पाहिले की पुन्हा वापरता येण्याजोग्या डिझाइन आणि टेम्पलेट्सच्या लायब्ररीवर काम करणे हा एक उत्तम पर्याय आहे.

येथूनच मग खऱ्या अर्थाने त्यांच्या स्टार्टअपची सुरुवात झाली. त्यांनी सुरुवातीला डिझाईन टेम्पलेट ऑनलाइन विकण्यास सुरुवात केली. हा त्यांचा व्यवसाय नुकताच सुरू झाला होता की त्यांच्यासोबत एक अपघात घडला. अपघातामुळे ते अंथरुणावर काही महिने खिळून बसले. यादरम्यान त्यांनी आपली पहिली कंपनी सुरू केली.

Ninthmotion ही पहिली कंपनी त्यांनी 2015 मध्ये सुरू केली. या कंपनीने अवघ्या काही महिन्यांच्या काळातच 6,000 ग्राहक जोडले. यानंतर त्यांनी 2020 मध्ये Doographics ही दुसरी कंपनी सुरू केली. विशेष म्हणजे लॉकडाऊन च्या काळात गावी असतांना त्यांनी गावातील गोठ्यामध्ये आपली कंपनी सुरू ठेवली.

त्यांनी गावातील त्यांच्या मित्रांना देखील ग्राफिक्स आणि ॲनिमेशन शिकवले आणि त्यांना त्यांच्या नोकरीत कामाला लावले. आजच्या घडीला दादासाहेब यांच्या कंपनीची नेटवर्थ दोन कोटी रुपये एवढी आहे. विशेष म्हणजे या चालू वर्षात ही कंपनीत 10 कोटी रुपयांची होईल असा त्यांचा विश्वास आहे.

निश्चितच एकेकाळी चार हजार रुपयांच्या पगारावर नोकरी करणाऱ्या दादासाहेबांनी अवघ्या काही वर्षांच्या काळात करोडो रुपयांच्या कंपनीचे साम्राज्य उभे करून इतर तरुणांसाठी मार्गदर्शक असे काम केले आहे. मराठी माणूस देखील यशस्वी उद्योजक होऊ शकतो हे दादासाहेबांनी या निमित्ताने दाखवून दिले आहे.

विशेष बाब अशी की, दादासाहेबांच्या या कार्याची दखल 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील घेतली आहे. 2020 मधील मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दादासाहेबांच्या कामाचा उल्लेख केला होता. निश्चितच दादासाहेब भगत यांची ही यशोगाथा संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण वर्गासाठी दिशादर्शक राहणार आहे यात शंकाच नाही.