Maharashtra Havaman Andaj : नोव्हेंबर महिन्याचा शेवट हा अवकाळी पावसाने झाला. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पावसाने महाराष्ट्रात अक्षरशः त्राहीमाम माजवला होता. अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले.
तसेच या चालू डिसेंबर महिन्याची सुरुवात देखील अवकाळी पावसानेच झाली. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मिचाँग चक्रीवादळामुळे देशातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बरसला.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील काही भागांमधून अवकाळी पाऊस पूर्णपणे माघारी फिरला आहे. मात्र राज्यातल अवकाळी पावसाचे सावट अजूनही पूर्णपणे नाहीसे झालेले नाही. भारतीय हवामान विभागाने आणखी काही दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज नुकताच वर्तवला आहे.
यामुळे निश्चितच शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 15 डिसेंबर पासून उत्तर भारतात थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तापमानात हळूहळू घट होईल आणि थंडीचा जोर वाढेल असा अंदाज आहे. याशिवाय ईशान्येकडील राज्यांमध्ये दाट धुके पडेल असे बोलले जात आहे.
मिचाँग चक्रीवादळ पूर्णपणे निवळल्यानंतर आता देशातील काही भागांमध्ये पाऊस थांबला आहे. काही भागात थंडी देखील वाढली आहे. तथापि अजूनही देशातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने देशातील काही राज्यांमध्ये पावसाचा अंदाज दिला आहे.
Skymet ने सांगितल्याप्रमाणे, दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ, लक्षद्वीप, कर्नाटकचा किनारी भाग आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाऊस हजेरी लावणार आहे. महाराष्ट्रात आगामी दोन-तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील कोकण आणि विदर्भात पाऊस पडेल असा अंदाज आहे. विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांत पाऊस हजेरी लावणार असा अंदाज देण्यात आला आहे. मात्र उर्वरित राज्यात आता थंडीचा जोर वाढेल असे देखील हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.