Cyclone Michaung : मोठी बातमी ! बंगालच्या उपसागरात तयार होणार नवीन ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळ बरसणार मुसळधार वादळी पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cyclone Michaung : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासहित देशातील विविध भागांमध्ये पाऊस सुरु आहे. महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यात 25 तारखेपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. 25 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला आहे.

26 नोव्हेंबरला तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. लाल कांदा, रांगडा कांदा, द्राक्ष, हार्वेस्टिंग साठी तयार झालेल्या कापसाचे अन तुरीचे मोठे नुकसान झाले आहे.

विशेष म्हणजे हवामान खात्याने आज देखील राज्यातील बहुतांशी भागांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज दिला आहे. आज राज्यातील मराठवाडा मधील काही भाग, मध्य महाराष्ट्रातील काही भाग, उत्तर कोकणातील काही जिल्ह्यात आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे.

उद्यापासून मात्र राज्यातील पावसाळी वातावरण निवळणार आहे. उद्यापासून अवकाळी पाऊस विश्रांती घेणार असा अंदाज आहे. उद्या राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ हवामान राहील मात्र तदनंतर राज्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढेल असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

अशातच आता बंगालच्या उपसागरात पुन्हा एका नवीन चक्रीवादळाची निर्मिती होत असल्याचे हवामान तज्ञांनी नमूद केले आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉक्टर के एस होसाळीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या भागात कमी दाबाचे एक नवीन क्षेत्र तयार झाले आहे.

काल अर्थात 27 नोव्हेंबर 2023 रोजी हे कमी दाब क्षेत्र तयार झाले आहे. विशेष म्हणजे हा कमी दाबाचा पट्टा पुढे ओडिषा आणि तामिळनाडूच्या दिशेने सरकणार आहे. तसेच हे कमी दाबाचे क्षेत्र उद्या म्हणजे बुधवारी २९ नोव्हेंबरपर्यंत आग्नेय बंगालच्या उपसागरात दबावात बदलण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मग त्यानंतर पुढील ४८ तासांत म्हणजेच एक डिसेंबर च्या सुमारास नैऋत्य बंगालच्या उपसागरात हा कमी दाबाचा पट्टा तीव्र होण्याची शक्यता आहे. मग हा तीव्र कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळात परावर्तित होणार असा अंदाज आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या या नवीन चक्रीवादळाला ‘मिचॉन्ग’ असे नाव देण्यात आले आहे.

विशेष म्हणजे बंगालच्या उपसागरात या आधी देखील दोन चक्रीवादळ तयार झाली होती. सुरुवातीला हामुन आणि नंतर मिथिली चक्रीवादळ तयार झाले होते. या चक्रीवादळाचा मात्र फारसा विपरीत परिणाम झाला नाही. पण बंगालच्या उपसागरात तयार होणारे हे नवीन चक्रीवादळ पुढल्या महिन्यात अर्थातच मंगळवारी, ५ डिसेंबर रोजी आंध्रप्रदेश आणि दक्षिण ओडिशा किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

याचा परिणाम म्हणून तामिळनाडू ओडिशा आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस बरसणार असे सांगितले जात आहे. यामुळे आता या चक्रीवादळाची तीव्रता भारतासाठी किती घातक ठरते हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. मात्र बंगालच्या उपसागरात तयार झालेले हे चक्रीवादळ महाराष्ट्रावर कोणताच विपरीत परिणाम करणार नाही असे मत काही तज्ञांनी वर्तवली आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा