Crop Damage Compensation : यावर्षी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्याला अतिवृष्टीचा सर्वात जास्त फटका बसला आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात देखील मराठवाड्यातील परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली.
या दोन्ही जिल्ह्यातील एकूण पाच तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पोटी भरपाई म्हणून शासनाने 93 कोटी 20 लाखाची मदत जाहीर केली आहे. त्याचा जवळपास एक लाख 47 हजार 613 शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
विशेष म्हणजे हा निधी वितरित करण्यास 17 डिसेंबर रोजी एक जीआर काढून मान्यता देण्यात आली आहे. परंतु सरकारी काम आणि सहा महिने थांब याप्रमाणे वितरणाचा जीआर आल्यानंतर देखील निधी वितरत होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे संबंधित पाहतेत शेतकरी बांधव मदतीची आतुरतेने वाट पाहत आहेत.
सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातील बहुतांशी भागात अतिवृष्टी आणि परतीचा पाऊस कोसळला. याचा शेतीपिकांना मोठा फटका बसला. पिके पाण्याखाली गेली, अंतिम टप्प्यात कोसळलेला हा पाऊस हाता-तोंडाशी आलेला घास घेऊन गेला.
यामुळे शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा होती. याच पार्श्वभूमीवर शासनाकडून परभणी जिल्ह्यातील परभणी, सेलू, पाथरी, पूर्णा तालुक्यातील आणि हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ या तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे.
यामध्ये परभणी जिल्ह्यातील 92 हजार 737 तसेच हिंगोली जिल्ह्यातील 54 हजार 876 बाधित शेतकऱ्यांना 93 कोटी 20 लाखांची मदत मिळाली आहे. ही मदत प्रति हेक्टर 13,600 एवढी राहणार असून क्षेत्र मर्यादा ही तीन हेक्टरपर्यंत राहणार आहे.
एकंदरीत परभणी जिल्ह्यासाठी ७६ कोटी ३९ लाख ८० हजार रुपये आणि हिंगोली जिल्ह्यांसाठी १६ कोटी ८० लाख ९६ हजार रुपये निधी केव्हा कधी वितरित होईल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.