Cow Milk Subsidy : राज्यात शेती सोबतच इतरही अनेक शेतीशी निगडित व्यवसाय मोठ्या प्रमाणात केले जातात. यात दुधाचा व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. दूध व्यवसायासाठी आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात गाय पालन केले जात आहे.
गाईच्या दुधाचा व्यवसाय हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. या व्यवसायाला ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखले जाते.
अलीकडे मात्र दुधाचा व्यवसाय शेतकऱ्यांना परवडत नाहीये. विविध कारणांमुळे दूध उत्पादक शेतकरी संकटात आले आहेत.
वाढती महागाई, इंधनाचे वाढलेले दर, पशुखाद्याचे वाढत असलेले दर, मजुरीचे वाढलेले दर तसेच कमी होत चाललेले दुधाचे दर या सर्व पार्श्वभूमीवर दुधाचा व्यवसाय आता परवडत नाहीये असा ओरड शेतकऱ्यांकडून होऊ लागला आहे.
यामुळे अनेकांनी दुधाचा व्यवसाय आता बंद केला आहे. मात्र असे असले तरी आजही अनेक शेतकरी बांधव या व्यवसायात कार्यरत असून त्यांच्यापुढे वेगवेगळे आव्हान उभे राहिले आहे.
दरम्यान, दूध उत्पादक शेतकऱ्यांचे याचा अडचणी लक्षात घेऊन राज्यातील वर्तमान शिंदे-फडणवीस-पवार सरकारने शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी पाच रुपये प्रति लिटर एवढे अनुदान जाहीर केले आहे.
हे अनुदान सुरुवातीला सहकारी दूध उत्पादक संघांनाच दिले जाणार होते. मात्र, नंतर खाजगी दूध उत्पादक संघांशी संलग्न असलेल्या शेतकऱ्यांना देखील अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.
आता याच दूध अनुदान योजने संदर्भात महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. ती म्हणजे राज्यातील गोकुळ दूध संघाशी संलग्न असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाय दूध अनुदान योजनेअंतर्गत 11 कोटी 32 लाख 49 हजार 835 रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात गायीच्या दुधासाठी अनुदान मिळवणारा गोकुळ दूध संघ हा राज्यातील पहिल्या क्रमांकाचा दूध संघ ठरणार असा दावा देखील संघाने केला आहे. दूध संघाच्या माध्यमातून शासनाकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांची माहिती पाठवण्यात आली आहे.
यामुळे आता लवकरच गोकुळशी संलग्न असलेल्या गायीचे दूध उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना 11 कोटी 32 लाखाहून अधिक अनुदानाची रक्कम मिळणार असे चित्र आहे. परिणामी या संबंधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे.