Cow Farming : शेती हा महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात केला जाणारा एक महत्त्वाचा मुख्य व्यवसाय आहे. शेतीचा व्यवसाय फार पूर्वीपासून केला जात आहे. काळाच्या ओघात शेतीच्या व्यवसायात बदलही पाहायला मिळत आहेत. आता शेतकरी बांधव शेतीमधून अधिकचे उत्पादन मिळावे यासाठी शेती सोबतच पशुपालनाचा म्हणजेच दुधाचा व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात करत आहेत. हा व्यवसाय शेतीशी निगडित व्यवसाय असल्याने यातून शेतकऱ्यांना खेळते भांडवल उपलब्ध होते.
विशेष म्हणजे शेतीमधून मिळणारे शेणखत आणि गोमूत्र खत म्हणून पिकाच्या उत्पादन वाढीसाठी उपयोगात आणले जाते. यामुळे या व्यवसायातून पैसा तर मिळतो शिवाय पीक उत्पादन वाढीला देखील मोठी चालना मिळते. दुधाच्या व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर दुधाच्या अधिक दूध उत्पादन देणाऱ्या जातींचे पालन करावे लागते. यामुळे महाराष्ट्रातील अनेक शेतकरी बांधव गायीच्या संकरित जातींच्या संगोपन करत आहेत.
अनेक शेतकऱ्यांच्या गोठ्यात तुम्हाला गायीच्या संकरित जातीच पाहायला मिळतील. परंतु भारतात अशाही अनेक देशी जाती आहेत ज्यां की चांगले दूध उत्पादन देण्यास सक्षम आहेत. दरम्यान आज आपण गाईच्या अशाच देशी जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.
गीर गाय : गुजरातच्या गिर जंगलात या गाईचे मूळ स्थान आढळून आले आहे. यामुळे या जातीला गिर गाय असे नाव पडले आहे. ही जात दूध उत्पादनासाठी विशेष ओळखली जाते. शिवाय या जातीच्या गायीच्या दुधात असणारे औषधी गुणधर्म मानवी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत.
यामुळे गीर गाईच्या दुधाला, तुपाला तसेच इतर बाय प्रोडक्टला बाजारात मोठी मागणी असते. गीर गाईच्या दुधाला इतर गाईच्या दुधापेक्षा अधिक भाव मिळतो. यामुळे शेतकऱ्यांनी या जातीच्या गायीचे संगोपन केले तर त्यांना अधिकचे उत्पन्न मिळू शकणार आहे.
ही गाय दिवसाला वीस ते पंचवीस लिटर पर्यंतचे दूध देऊ शकते असा दावा तज्ञांनी केलेला आहे. ब्राझीलमध्ये या गाईचे संवर्धन करण्यात आले असून त्या ठिकाणी ही गाय चाळीस ते पंचेचाळीस लिटर पर्यंतचे दूध देण्यास सक्षम बनली आहे.
साहिवाल : ही देखील भारतातील एक प्रमुख देशी जात आहे. या गाईचे मूळ स्थान पंजाब आणि राजस्थान मध्ये असल्याचा दावा केला जातो. ही गाय दिवसाला 13 ते 15 लिटर पर्यंतचे दूध देत असल्याचा दावा तज्ञांनी यावेळी केलेला आहे. यामुळे या गाईचे पालन करूनही शेतकऱ्यांना अधिकचे दूध मिळवता येणार आहे.
थारपारकर : ही देखील गाय अधिक दूध उत्पादन देणारी भारतातील एक प्रमुख देशी जात आहे. या जातीच्या गायीचे संगोपन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. ही गाय दिवसाकाठी आठ ते दहा लिटर पर्यंतचे दूध देण्यास सक्षम असल्याचा दावा तज्ञांनी केलेला आहे.
लाल सिंधी गाय : ही देखील गाय अधिक दूध उत्पादनासाठी ओळखली जाते. या जातीचे मूळ स्थान पाकिस्तान मधील सिंध प्रांत आहे. या जातीचे संगोपन भारत, पाकिस्तान, बांगलादेश या देशात मोठ्या प्रमाणात केले जाते. श्रीलंका मध्ये देखील ही जात आढळते.
ही गाय पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि ओडिशामध्येही आढळते. सध्या भारतात या गायीची संख्या खूपच कमी आहे, त्यामुळेच या जातीच्या संवर्धनासाठी केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. ही गाय एका वेतात १७२५ लिटर पर्यंतचे दूध देऊ शकते. या गायीच्या दुधात पाच टक्के फॅट आढळतो.