Cotton Variety : यंदा चांगल्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. 2024 मध्ये मान्सून काळात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस होणार असा अंदाज भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे. परिणामी यावर्षी कापूस लागवडीखालील क्षेत्र वाढणार आहे. कापसाबाबत बोलायचं झालं तर राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश हे तीन विभाग कापसाच्या उत्पादनासाठी विशेष ओळखले जातात.
या भागात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. दरम्यान जर तुम्हीही येत्या खरीप हंगामात कापसाची लागवड करण्याच्या तयारीत असाल तर आजचा हा लेख तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे.
कारण की आज आपण परभणी येथील कापूस संशोधन केंद्राने विकसित केलेल्या देशी कापसाच्या एका सुधारित जातीची माहिती जाणून घेणार आहोत.
परभणी येथील कापूस संशोधन केंद्राने अलीकडेच विकसित केलेल्या कापसाचे पीए ८३७ या देशी सरळ वाणाची आज आपण माहिती पाहणार आहोत.
कापसाचे पीए ८३७ वाण शेतकऱ्यांसाठी ठरणार फायदेशीर
कापसाचा हा वाण अलीकडेच विकसित झाला आहे. या वाणाची सर्वात मोठी विशेषता अशी की कोरडवाहू भागात याची लागवड करता येणे शक्य आहे. यामुळे कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी कापसाचा हा वाण फायदेशीर ठरणार आहे.
कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे या जातीचे कापूस पीक किडी, कडा करपा आणि दहिया या रोगास प्रतिकारक असल्याचे आढळून आले आहे.
या जातीचे पीक लागवडीनंतर सरासरी 150 ते 160 दिवसात परिपक्व होत असल्याचा दावा केला जातोय. उत्पादनाबाबत बोलायचं झालं तर या जातीपासून हेक्टरी 15 ते 16 क्विंटलचे सरासरी उत्पादन शेतकऱ्यांना मिळू शकते.
विशेष म्हणजे हा कापसाचा एक सरळ वाण आहे. याचा अर्थ असा की या जातीच्या कापसापासून मिळालेली सरकी पुढील चार वर्षे बियाणे म्हणून वापरता येणार आहे.
साहजिकच या जातीपासून मिळालेले सरकी बियाणे म्हणून वापरता येणार असल्याने शेतकऱ्यांचा बियाण्यावर होणारा हजारो रुपयांचा खर्च या निमित्ताने वाचू शकणार आहे.
निश्चितच परभणी कापूस संशोधन केंद्राने विकसित केलेला हा कापसाचा वाण शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरणार असून यातून त्यांना चांगली कमाई होणार आहे.