Cotton Rate : कापसाला पांढरे सोने म्हणून ओळखतात. या नगदी पिकाला पांढरे सोने म्हणण्याचे कारण असे की या पिकातून शेतकऱ्यांना हमखास चांगला पैसा मिळतो. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये हे पीक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. याला बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
दहा वर्षांपूर्वी कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास भाव मिळत होता. दरम्यान, या चालू हंगामातही कापसाला असाच भाव मिळत आहे. कापसाचा हंगाम विजयादशमीला सुरू झाला होता आणि आता हा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे.
यंदा संपूर्ण हंगामभर कापसाचे बाजारभाव सात हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपासच नमूद केले गेले आहेत. यामुळे दहा वर्षांपूर्वी जो भाव मिळत होता तोच भाव आत्ताही मिळतोय. इतर वस्तूंची महागाई मात्र भरमसाठ वाढली आहे.
परिणामी, शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात तीव्र रोष पाहायला मिळतं आहे. दहा वर्षांपूर्वी पांढऱ्या सोन्याला जो भाव मिळत होता तोच भाव आता मिळतोय. अर्थातच शेतकऱ्यांना आपला माल अगदी कवडीमोल बाजारभावात विकावा लागत आहे.
यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असून शेतकरी बांधव पूर्णपणे हतबल झाले आहेत. अशा या परिस्थितीत बाजार अभ्यासकांनी आगामी काळात कापसाचा बाजार कसा राहणार या संदर्भात आपले मत व्यक्त केले आहे.
बाजारभाव वाढणार का ?
यंदा केंद्र सरकारने कापसाला सात हजार वीस रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव जाहीर केला आहे. हमीभाव कमी जाहीर झाला असल्यानेच बाजारात कापसाला पाहिजे तसा भाव दिला जात नसल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
मध्यंतरी कापसाला साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळत होता मात्र बाजारभावातील ही तेजी जास्त काळ टिकू शकली नाही. मागच्या काही दिवसात जागतिक बाजारात कापूस बाजार भावात घसरण झाली असल्याने याचा परिणाम म्हणून देशांतर्गत बाजारभाव पडलेत.
दुसरीकडे सरकीचे दर देखील दबावात आहेत. तसेच कापूस उत्पादन वाढले असल्याचा अंदाज काही संस्थांनी व्यक्त केला आहे. या साऱ्या घडामोडींमुळे कापसाचे भाव वाढले नसल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
सध्या स्थितीला कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल ते 7400 रुपये प्रति क्विंटल असा सरासरी दर मिळत आहे. पण, या बाजारभावात आगामी काळात सुधारणा होण्याची शक्यता आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये कापुस बाजारभाव सुधारू शकतात असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
कापसाचे बाजारभाव आठ हजार रुपये प्रति क्विंटल ते साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचू शकतात असे बाजार अभ्यासकांनी म्हटले आहे. पण, बाजारभावात यापेक्षा जास्तीची वाढ यंदा तरी होणार नसल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. यामुळे शेतकऱ्यांना ही गोष्ट लक्षात ठेवून आपल्या विक्रीचे नियोजन करावे लागणार आहे.