Cotton Rate : विजयादशमीपासून सुरू असलेला कापूस हंगाम शेतकऱ्यांसाठी मोठा चिंतेचा राहिला आहे. आता मात्र शेतकऱ्यांची ही चिंता दूर होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. खरे तर गेल्या हंगामातही कापसाला अपेक्षित असा भाव मिळाला नाही.
मात्र गेल्या हंगामात अनेक ठिकाणी कापसाला हमीभावापेक्षा अधिकचा भाव मिळाला होता. या चालू हंगामात मात्र हंगामाच्या अगदी सुरुवातीपासूनच कापसाचे भाव दबावात आहेत. यामुळे शेतकरी बांधवांची चिंता वाढलेली आहे.
पण, आता गेल्या तीन ते साडेतीन महिन्यांपासून दबावात असलेला कापसाचा बाजार तेजीत येण्याची शक्यता आहे. वास्तविक देशांतर्गत कापूस सरकीचे दर अजूनही नियंत्रणातच आहेत.
तथापि जागतिक बाजारात रुईचे भाव वाढले आहेत. याचा फायदा म्हणून देशांतर्गत कापूस बाजार भाव हळूहळू वाढू लागले असेल. एवढेच नाही तर भविष्यात त्यामध्ये आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे.
सध्या भारतीय बाजारात पावसाचा फटका बसलेल्या कापसाला 6800 ते 7000 रुपये प्रति क्विंटल आणि चांगल्या कापसाला सात हजार रुपये ते 7500 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी मात्र कापसाला असाही भाव मिळत नव्हता. आता मात्र कापसाचे भाव बऱ्यापैकी सुधारले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू लागला आहे. विशेष बाब अशी की, हे बाजार भाव आगामी काळात 8,000 ची पातळी गाठणार असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे.
मात्र, यासाठी कापूस उत्पादकांनी टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री करणे आवश्यक आहे. कापूस पणन महासंघाचे माजी सरव्यवस्थापक गोविंद वैराळेजी यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी कापूस विक्री एकमुस्त न करता टप्प्याटप्प्याने करावी.
फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा मग मार्चमध्ये आणि मग एप्रिल मध्ये अशा टप्प्याटप्प्यात शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केल्यास त्यांना यातून चांगला फायदा मिळू शकतो.
एकंदरीत, शेतकऱ्यांनी आपला कापूस एकदाच बाजारपेठेत घेऊन न जाता टप्प्याटप्प्याने त्याची विक्री केल्यास शेतकऱ्यांना दरवाढीचा फायदा घेता येणार आहे.
शिवाय, सर्वच शेतकरी टप्प्याटप्प्याने बाजारात माल जर घेऊन आलेत तर आवक वाढणार नाही. यामुळे आवकेचा दरावर दबाव येणार नाही.