Cotton Rate : गेल्या दोन वर्षांपासून पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापसाचे पीक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या हंगामात कापुस बाजारभावाने शेतकऱ्यांची निराशा केली होती आणि या चालू हंगामात देखील तसेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे.
सध्याचा कापसाचा भाव हा शेतकऱ्यांसाठी परवडणारा नसल्याचे म्हटले जात आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार दहा वर्षांपूर्वी कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत होता.
विशेष म्हणजे आता देखील कापसाला तसाच भाव मिळतोय. गेल्या दहा वर्षांच्या काळात सर्वच वस्तूंची महागाई वाढली आहे. कृषी निविष्ठांच्या किमती, मजुरी अन इंधनाचे दर तसेच इतर सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले आहेत.
यामुळे कापसाला मिळत असलेला सध्याचा भाव हा कपाशी पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. खरेतर केंद्र शासनाने कापसाला सात हजार वीस रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर केला आहे.
मुळात हमीभावच हा फार कमी जाहीर झाला असल्याने सध्या बाजारभाव दबावत असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. अशातच गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव पडले आहेत.
सरकीचे दर देखील दबावात आहेत. विशेष म्हणजे उद्योग लॉबीकडून कापसाचे उत्पादन वाढवून दाखवले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सध्या देशांतर्गत कापूस बाजार भाव दबावात आहेत.
सध्या स्थितीला कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल ते 7400 रुपये प्रति क्विंटल असा सरासरी भाव मिळतोय. पण आगामी काळात यामध्ये आणखी वाढ होणार असा अंदाज कॉटन मार्केटचे अभ्यासक वर्तवत आहेत.
बाजार अभ्यासकांनी म्हटल्याप्रमाणे, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा बाजार भावात सुधारणा पाहायला मिळणार आहे.
कापसाचे बाजार भाव आठ हजार रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचू शकता. मात्र साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिकचा भाव या चालू हंगामात तरी मिळणार नसल्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
यामुळे शेतकऱ्यांना यंदा 9000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दरातच कापूस विकावा लागणार असे चित्र तयार होत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी या गोष्टी लक्षात ठेवून आपल्या मालाच्या विक्रीचे नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.