Cotton Rate Maharashtra : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. पांढऱ्या सोन्याला झळाळी मिळाली असून राज्यातील ताडकळस ताडकळस येथे ‘सीसीआय’अंतर्गत खरेदीमध्ये कापसाला सर्वोच्च भाव मिळाला आहे.
या ठिकाणी तीन दिवसांपूर्वी अर्थातच 10 डिसेंबर रोजी कापूस खरेदीला सुरुवात झाली अन गेल्या तीन दिवसांच्या काळात येथे कापसाची विक्रमी आवक झाली. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या तीन दिवसांच्या काळात या ठिकाणी कापसाची 1100 क्विंटल आवक झाली.
या ठिकाणी कापसाला कमाल 7471 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या कापसाला शासनाने हमीभाव जाहीर केला असून याअंतर्गत ताडकळस कृषी बाजार समितीत ‘सीसीआय’कडून कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे.
10 डिसेंबर रोजी बाजार समितीचे सभापती बालाजी रुद्रवार यांच्या हस्ते सी सी आय कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. सीसीआय कापूस खरेदीला सुरुवात झाली असल्याने परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा मिळतोय. शेतकऱ्यांना आपला कापूस आतापर्यंत हमीभावापेक्षा कमी दरात विकावा लागत होता.
मात्र आता सीसीआयची कापूस खरेदी सुरू झाली असल्याने या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना किमान हमीभावाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून समाधान व्यक्त करण्यात आले असून या कापूस उत्पादकांना सी सी आय च्या कापूस खरेदीचा दिलासा मिळतोय.
सीसीआयच्या कापूस खरेदीच्या शुभारंभासाठी बाजार समितीचे उपसभापती अंकुशराव शिंदे, सरपंच गजानन आंबोरे यांच्यासह शेतकरी, सीसीआयचे अधिकारी, बाजार समिती संचालक मंडळाची उपस्थिती होती.
दरम्यान, बाजार समिती प्रशासनाच्या माध्यमातून सीसीआयची कापूस खरेदी सुरू झाली असून शेतकऱ्यांनी आपला माल येथे विक्रीसाठी आणावा असे आवाहन करण्यात आले आहे. खरे तर दरवर्षी विजयादशमीपासून नवीन कापसाची बाजारात आवक होत असते.
यंदाही विजयादशमीपासून नव्या मालाची आवक सुरू झाली असून आतापर्यंत कापसाचे दर दबावातच होते. खरे तर गत दोन वर्षांपासून कापसाचे दर हे दबावात आहेत. दोन वर्षांपूर्वी कापसाला बाजारात दहा हजार रुपयांचा भाव मिळाला होता.
काही ठिकाणी याहीपेक्षा अधिकचा दर मिळाला होता. मात्र अलीकडील वर्षांमध्ये कापसाचे दर आठ हजार रुपयांच्या खालीच आहेत. गेल्यावर्षी तर अनेक शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दरात आपल्या मालाची विक्री केली.
यंदाही सुरुवातीच्या टप्प्यात अशीच परिस्थिती पाहायला मिळाली आणि यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आता मात्र राज्यातील अनेक बाजारांमध्ये सीसीआय अंतर्गत कापूस खरेदी सुरू झाली असून या ठिकाणी शेतकऱ्यांचा कापूस हमीभावात खरेदी होतोय.