Cotton Rate Hike : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून कापसाचे बाजारभाव दबावात आहेत. हंगाम सुरू झाल्यापासून अर्थातच विजयादशमीपासून कापसाचे भाव दबावात आहेत.
अशातच मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून कापसाच्या बाजारभावात सुधारणा होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे पुन्हा एकदा कापसाचे भाव दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत अशी भोळी भाबडी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.
कापूस हे राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. याची शेती राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये केली जाते. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश मधील बहुतांशी जिल्ह्यात कापसाच्या पिकावर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते.
मात्र यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापसाचे भाव दबावात असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागला आहे. अनेकांना पैशांची निकड होती यामुळे हंगाम सुरू झाल्यानंतर लगेचच कापूस विक्री करावा लागला.
मात्र, हंगाम सुरू झाल्यापासून कापसाच्या बाजारात मोठा दबाव पाहायला मिळाला. कापसाला केंद्र शासनाने 7 हजार 20 रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव जाहीर केला आहे. पण, गेल्या आठवड्यापर्यंत कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत होता. पण आता ही परिस्थिती हळूहळू बदलू लागली आहे.
कारण की पांढऱ्या सोन्याचे भाव आता वाढत आहेत. 16 फेब्रुवारी 2024 ला अर्थातच तीन दिवसांपूर्वी राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला तब्बल 9,675 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल भाव मिळाला होता. विशेष म्हणजे हा या हंगामातील सर्वोच्च भाव आहे.
परिणामी कापूस उत्पादकांना आता पुन्हा एकदा कापसाचे भाव वाढतील आणि दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत कापसाचे भाव पोहोचतील अशी आशा वाटू लागली आहे. दरम्यान, राज्याच्या दुसऱ्या बाजारात समितीचा विचार केला असता तिथेही बाजारभावात थोडीशी सुधारणा पाहायला मिळत आहे.
चांगल्या दर्जाच्या कापसाला राज्यातील इतर बाजारात 7000 ते 7500 पर्यंतचा भाव मिळत आहे. पण पावसात भिजलेल्या कापसाला मात्र सात हजार रुपयांपेक्षा कमी दर मिळत आहे. दुसरीकडे बाजार अभ्यासकांनी शेतकरी बांधवांना टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री करावी असा सल्ला दिला आहे.
एकमुस्त कापूस विक्रीसाठी आणला तर शेतकऱ्यांना वाढीव दराचा फायदा मिळणार नाही असे मत व्यक्त होत आहे. तसेच एकमुस्त कापूस बाजारात दाखल झाल्यास आवक वाढेल आणि यामुळे दरावर दबाव येणार आहे.
परिणामी शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कापूस विक्रीसाठी आणावा असे जाणकारांनी म्हटले आहे. दुसरीकडे कापसाचे बाजारभाव हे 8000 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत जाऊ शकतात असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला आहे.