Cotton Rate : दोन वर्षांपूर्वी कापसाला चांगला भाव मिळाला होता. गेल्यावर्षी मात्र पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापूस कवडीमोल दरात विकले गेले. यंदाची परिस्थिती गेल्या वर्षीपेक्षा खराब आहे. कारण की, या वर्षी खरीप हंगामात झालेल्या कमी पावसामुळे आणि हवामान बदलामुळे कापूस पिकावर वेगवेगळ्या रोगांचे आणि कीटकांचे सावट पाहायला मिळाले.
प्रामुख्याने कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला. याचा परिणाम म्हणून यावर्षी कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे.
उत्पादनात घट आली आहे शिवाय बाजारात कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. यामुळे उत्पादकांची दुहेरी कोंडी झाली आहे. कापूस लागवडीपासून ते वेचणी पर्यंत मोठ्या प्रमाणात मजूर लागते.
मात्र मजूर टंचाईमुळे आणि वाढत्या मजुरीमुळे कापूस पीक उत्पादित करण्यासाठी अधिकचा खर्च करावा लागत आहे. सोबतच कृषी निविष्ठांच्या किमती देखील दिवसेंदिवस वाढत आहेत.
यामुळे आता अनेक शेतकऱ्यांनी कापूस पिकाकडे पाठ फिरवली आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
आंबेडकर यांनी जर आमचे सरकार निवडून आले तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाचशे रुपयाचा बोनस दिला जाईल असे म्हटले आहे.
दोन दिवसांपूर्वी अर्थातच बुधवारी पत्रकारांशी उपराजधानी नागपूर येथे संवाद साधताना त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पांढऱ्या सोन्याचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत शासनाचे उदासीन धोरण असल्याचे म्हटले आहे.
कापसाचे आयात तथा निर्यात बाबतचे धोरण देखील चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे कापूस उत्पादकाचे नुकसान होत असून आम्ही सत्तेवर आल्यास त्यांना पाचशे रुपयाचा बोनस जाहीर करू असे आश्वासन प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे.
याशिवाय कापसाच्या वेचणीसाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रति किलो पाच रुपयाचे अनुदान जमा करणार असे देखील त्यांनी म्हटले आहे.
एकंदरीत, येत्या काही दिवसात राज्यात लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक होणार असल्याने या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. यामुळे आता सर्वसामान्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या जात आहेत.