Cotton Rate : गेल्या आठवड्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. कापसाचे बाजारभाव तब्बल 300 ते 400 रुपयांनी घसरले आहेत. यामुळे राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील कापूस उत्पादक संकटात सापडले आहेत.
कापूस हे महाराष्ट्रात पिकवले जाणारे एक महत्त्वाचे पीक आहे. या पिकाची राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात लागवड केली जाते. एकंदरीत या पिकाच्या शेतीवर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे.
मात्र बाजारात सध्या कापसाला खूपच कमी भाव मिळतोय. हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. केंद्र शासनाने मध्यम स्टेपल कापसाला 6,620 रुपये प्रतिक्विंटल एवढा हमीभाव जाहीर केला आहे.
तसेच लॉंग स्टेपल कापसाला 7 हजार 20 रुपये प्रतिक्विंटल एवढा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. सध्या स्थितीला मात्र हमीभावापेक्षा कमी दर कापसाला मिळतोय.
कापसाचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या खानदेश मधील जळगाव जिल्ह्यात कापूस 6400 प्रतिक्विंटल ते 6650 रुपये प्रति क्विंटल या बाजारभावात विकला जात आहे.
यामुळे नगदी पीक समजले जाणारे कापूस शेतकऱ्यांसाठी डोईजड ठरू लागले आहे. कापूस उत्पादक शेतकरी बांधव बाजारभावात वाढ होईल अशी भोळीभाबडी आशा लावून बसले आहेत.
शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने कापसाची साठवणूक करण्याला पसंती दाखवली आहे.
हमीभावापेक्षा कमी दरात कापसाची विक्री केली तर पिकासाठी आलेला खर्च देखील भरून निघणार नाही यामुळे सध्या शेतकरी बांधव भाव वाढतील या आशेने कापसाची साठवणूक करत असल्याचे चित्र आहे. पण कापसाची साठवणूक आणखी किती दिवस करावी लागेल ? हा मोठा सवाल आहे.
2022 मध्ये जानेवारी 1 फेब्रुवारी या कालावधीत कापसाला 10 ते 11 हजार रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला होता. सध्या स्थितीला मात्र कापसाचे भाव साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास आहेत.
त्यामुळे शेतकरी बांधव कापसाला किमान दहा हजार रुपयांचा भाव मिळाला पाहिजे अशी आशा बाळगून बसले आहेत. त्यामुळे आता भविष्यात भाव वाढलेत तरी किती भाव वाढणार ? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.