Cotton Rate : कपाशी हे राज्यातील खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्यात पिकवले जाणारे एक महत्त्वाचे पीक आहे. कपाशी पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. कापसाला राज्यातील शेतकरी बांधव पांढर सोन म्हणून ओळखतात. याचे कारण म्हणजे या पिकाला नगदी पिकाचा दर्जा प्राप्त असून याच्या विक्रीतून शेतकऱ्यांना लगेचच पैसे मिळतात.
पण, गेल्या दोन वर्षांपासून हे पीक मात्र शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे हवामान बदलामुळे आता शेतकऱ्यांना कापूस पिकातून अपेक्षित उत्पादन मिळत नाहीये.
विविध रोगांचे सावट, गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव यामुळे या पिकाची एकरी उत्पादकता कमी झाली आहे. दुसरीकडे उत्पादन कमी होत असले तरी देखील कृषी निविष्ठांच्या आणि मजुरीच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने उत्पादन खर्च हा दिवसेंदिवस वाढतच आहे.
यातच कहर म्हणजे शेतकऱ्याने साऱ्या नैसर्गिक आणि सुलतानी संकटांचा सामना करून पिकवलेल्या कापसाला बाजारात चांगला भाव सुद्धा मिळत नाहीये.
गेल्या दोन वर्षांपासून बाजार समितीमध्ये कापूस अगदी कवडीमोल दरात विकला जात आहे. या चालू हंगामात देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळाली आहे. यंदाच्या हंगामात सुरुवातीपासून म्हणजेच विजयादशमीपासून बाजार भाव दबावात असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे आता हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. तरीही भावातील चढ-उतार कायमच आहे. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात नरमाई आली आहे.
जागतिक बाजारातील वायदेसुद्धा कमी झाले आहेत सध्या जागतिक वायदे बाजार ८२.६५ सेंटवर आले आहेत. तर देशातील वायदे ६० हजार १०० रुपये प्रतिखंडीवर नमूद केले गेले आहेत. दुसरीकडे सीसीआयने आपले कापूस विक्रीचे भाव कमी केले आहेत.
दरम्यान आंतरराष्ट्रीय तथा देशांतर्गत वायदे बाजारात आलेला दबाव आणि सीसीआयने कापूस विक्रीचे भाव कमी केले असल्याने याचा दबाव देशातील बाजारावर आला आहे.
या साऱ्या घडामोडींमुळे देशातील कापसाचे भाव गेल्या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. तीन दिवसातच कापसाचे सरासरी बाजार भाव ३०० रुपयांनी कमी झाले आहेत.
सध्या कापसाला बाजार समितीमध्ये सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळतं आहे. विशेष म्हणजे आगामी काही दिवस कापूस बाजारात अशीच चढ-उतार राहू शकते असा अंदाज तज्ञांनी यावेळी व्यक्त केला आहे.