Cotton News : पांढर सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला सध्या सात हजार रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा दर मिळत आहे. काही एपीएमसी मध्ये यापेक्षा अधिक दर मिळत आहे मात्र असे असले तरी 8500 प्रतिक्विंटल पेक्षा कमीच दर कापसाला मिळत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या मते कापूस उत्पादित करण्यासाठी त्यांना जवळपास 8200 प्रतिक्विंटल एवढा खर्च येतो.
आता, सध्याच्या बाजारभावात जर कापसाची विक्री झाली तर कापूस पीकासाठी झालेला उत्पादन खर्च काढण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. हेच कारण आहे की सध्या बाजारात हमीभावापेक्षा कापसाला अधिक दर मिळत असला तरी देखील कापूस विक्रीसाठी शेतकरी धजावत नाहीयेत.
खरं पाहता, गेल्या हंगामात कापूस विक्री बारा हजार रुपये प्रतिक्विंटल दरम्यान झाली होती. साहजिकच गेल्यावर्षी चांगला दर मिळाला असल्याने तशीच परिस्थिती यंदा देखील राहील आणि पदरी चार पैसे अधिक शिल्लक राहतील अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु यंदाच्या हंगामात कापूस दरात मोठी चढ-उतार राहिली आहे.
हंगाम सुरू झाला आणि मुहूर्ताचा कापसाला व्यापाऱ्यांनी 14 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर दिला. साहजिकच हा दर बोटावर मोजण्या इतक्याचं शेतकऱ्यांना मिळाला. यामुळे मात्र कापूस वेचणीचे दर आकाशाला भिडलेत. यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली. दरम्यान शेतकऱ्यांचा कापूस घरात आल्यानंतर दर सात हजार रुपये ते 8000 रुपये प्रति क्विंटल च्या घरात आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. मध्यंतरी 9000 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर कापसाला मिळत होता. मात्र डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कापूस बाजाराचे चित्र पूर्णपणे बदलल असून कापसाला मात्र 7000 रुपये प्रति क्विंटल ते 8000 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. जानेवारी महिन्याची सुरुवात थोडीशी सकारात्मक झाली. दरात जवळपास 500 रुपयांची वाढ झाली होती.
राज्यातील अनेक बाजारात कापसाने 9000 चा टप्पा गाठला होता काही ठिकाणी याहीपेक्षा अधिक दर होता. मात्र ही तयार झालेली नवोदित परिस्थिती अधिक काळ टिकू शकली नाही. आता गेल्या तीन दिवसांपासून कापूस दरातील घसरण वाढली असून सद्यस्थितीला प्रमुख कापूस उत्पादक जिल्हा वर्धा या ठिकाणी 7000 ते 8000 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.
वर्ध्यासारखेच परिस्थिती राज्यातील इतरही कापूस उत्पादक जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या मते, गत हंगामात 11000 ते 12 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. यामुळे यंदा कापसाची लागवड वाढवली. पण यावर्षी अतिवृष्टीमुळे कापूस पिकाला अधिक खर्च करावा लागला आणि उत्पादन कमी मिळाले.
शिवाय आता कापसाला कमी दर मिळत असल्याने उत्पादन खर्च कसा भरून काढायचा हा मोठा प्रश्न उभा झाला आहे. यामुळे सद्यस्थितीला शेतकऱ्यांनी कापूस विक्री ऐवजी दरवाढीची आशा ठेवत साठवणूक सुरू केली आहे.