Cotton Market 2023 : कापूस हे महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. याची लागवड खरीप हंगामामध्ये केली जाते. कापूस लागवडीच्या बाबतीत आणि उत्पादनाच्या बाबतीत आपल्या महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक लागतो. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकरी या पिकाची लागवड करतात.
मात्र गेल्या दोन वर्षांपासून कापसाचे पीक शेतकऱ्यांना परवडत नाहीये. गेल्या हंगामात कापसाला अपेक्षित भाव मिळाला नाही आणि या चालू हंगामातही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. खरेतर अनेकांनी भाव वाढतील या अपेक्षेनं कापूस अजून विकलेला नाही.
पण, विजयादशमीपासून सुरू झालेल्या या हंगामात बाजारभावात अपेक्षित वाढ झालेली नाहीये. कापसाचा भाव हा प्रती क्विंटल 7000 ते 7500 रुपयांच्या दरम्यान पाहायला मिळतं आहे. शेतकऱ्यांच्या मते या भावात जर मालाची विक्री केली तर पिकासाठी आलेला खर्चही भरून काढता येणार नाही.
एक तर गेल्या काही वर्षांमध्ये कापूस पीक उत्पादित करण्यासाठी लागणारा उत्पादन खर्च वाढला आहे. दुसरे म्हणजे कापसाची उत्पादकता कमी झाली आहे. यामुळे कापसाला किमान नऊ ते दहा हजार रुपये प्रति क्विंटाला साधारण मिळायला हवा होता.
मात्र शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे सध्या बाजारात काहीच घडत नसल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी बांधव चिंतेत आले आहेत. अगदी कवडीमोल दरात कापूस विक्री करावा लागत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
अशा परिस्थितीत आता आपण भविष्यात कापसाचे भाव कसे राहणार? भविष्यात कापसाचा बाजार कसा राहील, भाव वाढ होणार की नाही याबाबत तज्ञांनी दिलेली माहिती थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
बाजार भाव दबावात असण्याचे कारण
बाजार अभ्यासकांनी सांगितल्याप्रमाणे, देशातील कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासोबतच आंतरराष्ट्रीय मार्केटमधील रुईचे दर हे खाली आले आहेत. 100 सेंटपर्यंत असणारे दर आता 82 ते 85 सेंटपर्यंत खाली आले आहेत.
तसेच आधी सरकीचे रेट वाढलेले होते पण ते सुद्धा आता कमी झाले आहेत. हेच काही प्रमुख कारणे आहेत की सध्या कापूस बाजारभाव दबावात असल्याचे मत व्यक्त होत आहे.
भाव वाढ होणार का?
आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आगामी काळात कापसाचे भाव वाढणार का? तज्ञ सांगतात की सध्या, कापसाला 7000 ते 7500 रुपये प्रती क्विंटल असा भाव मिळत आहे. दरम्यान आगामी काळात दर यापेक्षा खालावण्याची शक्यता फारच कमी झाली आहे. तसेच, कापसाच्या बाजारभावात वाढ झाली तर ती जास्तीत जास्त 10 % एवढी होऊ शकते.
म्हणजेच कापसाचे बाजार भाव यापेक्षा कमी होणार नाहीत आणि जर भाव वाढ झाली तरी देखील ती दहा टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही असे तज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारातील ही परिस्थिती लक्षात घेऊन आपल्या विक्रीचे योग्य पद्धतीने नियोजन करणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.