Cotton Farming : कापूस हे महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. याची लागवड राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये केली जाते. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील बहुतांशी जिल्ह्यात कापसाची लागवड केली जाते. राज्यातील काही शेतकरी बांधव कापसाचे फरदड उत्पादन घेतात.
यामुळे अनेकांच्या माध्यमातून फरदड उत्पादन घ्यायचे असल्यास कोणत्या वाणाची लागवड केली पाहिजे असा सवाल उपस्थित केला जात होता. खरंतर कृषी तज्ञांनी शेतकरी बांधवांना फरदड उत्पादन घेऊ नये असा सल्ला दिला आहे.
फरदड उत्पादनामुळे गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढतो. यामुळे फरदड उत्पादन घेणे टाळले पाहिजे असा सल्ला कृषी तज्ञांनी दिलेला आहे.
मात्र असे असले तरी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात फरदड कापूस उत्पादन घेतले जाते ही वास्तविकता नाकारून चालणार नाही. शेतकरी बांधव सांगतात की फरदड कापूस उत्पादनामुळे त्यांना अधिकचा खर्च न करता कापसाचे अतिरिक्त उत्पादन मिळवता येते.
यामुळे हे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरते. दरम्यान आज आपण जर शेतकरी बांधव कापसाचे फरदड उत्पादन घेत असतील तर त्यांनी कोणत्या वाणाची निवड केली पाहिजे जेणेकरून त्यांना चांगले उत्पादन पण मिळेल आणि त्यांचे नुकसान कमी होईल.
फरदड उत्पादनासाठी कापसाचा कोणता वाण निवडला पाहिजे?
तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, कापसाचा कबड्डी हा वाण फरदड उत्पादनासाठी देखील खूपच फायदेशीर आहे. खरे तर हा वाण महाराष्ट्रात खूपच लोकप्रिय आहे. या जातीची राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
या जातीची सर्व प्रकारच्या जमिनीत लागवड करता येणे शक्य आहे. तसेच बागायती आणि कोरडवाहू भागात हा वाण लागवडीसाठी चालतो. याचा पीक परिपक्व कालावधी हा 160 दिवस ते 180 दिवस यादरम्यानचा आहे.
या जातीच्या कापूस बोंडाचा आकार मोठा असतो. एका बोंडाचे वजन 5.30 ग्रॅम ते सहा ग्रॅम एवढे भरते. याची सर्वात मोठी विशेषता म्हणजे फरदड उत्पादनासाठी उत्कृष्ट आहे. या जातीवर हवामान बदलाचा देखील फारसा विपरीत परिणाम होत नाही ही याची आणखी एक मोठी विशेषता.
दुष्काळी स्थितीत तसेच जास्तीच्या पावसाच्या परिस्थितीत देखील या जातीच्या कापसापासून समाधानकारक उत्पादन मिळत असल्याचा दावा काही शेतकऱ्यांनी केला आहे.
ही जात शेतकऱ्यांच्या पसंतीस खरी उतरली असून गेल्यावर्षी या जातीच्या कापूस बियाण्याची मोठ्या प्रमाणात काळाबाजारी झाली होती. यामुळे शेतकऱ्यांना चढ्या दरात या जातीच्या कापसाच्या बियाण्याची खरेदी करावी लागली होती.