Cotton Farming : यावर्षी मान्सून काळात म्हणजे जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीत महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्तीच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदात भर पडली आहे. गेल्या वर्षी मान्सून काळात महाराष्ट्रात खूपच कमी पाऊस झाला होता. यंदा मात्र सरासरी पेक्षा जास्तीचा पाऊस होणार असा अंदाज आहे. यामुळे यंदा खरीप हंगामात मका, कापूस, सोयाबीन, कांदा इत्यादी पिकांचे लागवडीखालील क्षेत्र वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अशा परिस्थितीत आज आपण कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन हजर झालो आहोत. जर तुम्हालाही यंदाच्या खरीप हंगामात कापसाची लागवड करायची असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे.
कारण की, आज आपण खरीप हंगामात लागवडीसाठी सर्वोत्कृष्ट अशा कापसाच्या टॉप पाच जातींची माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील शेतकरी बांधव ज्या जातीच्या कापसाचे मोठ्या प्रमाणात शेती करतात त्या कापसाच्या वाणाची आज आपण माहिती पाहणार आहोत.
खरीप हंगामात लागवडीसाठी सर्वोत्कृष्ट कापसाचे टॉप पाच वाण कोणते ?
तुळशी सीड्स कंपनीचे कबड्डी वाण : तुळशी सीड्स कंपनीचे कबड्डी ही जात राज्यातील शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी शेतकरी या जातीच्या कापसाची लागवड करतात. मिळालेल्या माहितीनुसार या जातीच्या कापूस बोंडाचे वजन सहा ते सात ग्रॅम असते. तसेच या जातीचे पीक रसशोषक किडीस प्रतिकारक असल्याचे आढळून आले आहे. या जातीच्या पिकावर रस शोषक किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात पाहायला मिळतो यामुळे शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन मिळते.
राशी सीड्स कंपनीचे राशी 659 BG II : हा देखील वाण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये मोठा लोकप्रिय आहे. राज्यातील प्रमुख कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये या जातीची लागवड केली जाते. या जातीच्या कापसाला मोठे बोंड लागते. बोंडाचे वजन हे साडेसहा ग्रॅम ते सात ग्रॅम दरम्यान असते.
या जातीच्या लागवडीसाठी मध्यम काळी जमीन उपयुक्त ठरते. मध्यम काळ्या जमिनीत या जातीची लागवड केली तर चांगले दर्जेदार उत्पादन मिळते. या जातीचे पीक पाण्याचा ताण सहन करते. लवकर हार्वेस्टिंग साठी तयार होणारी जात म्हणून ओळखली जाते.
अजित सिड्स कंपनीचे अजित 155 BG II : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असा हा एक वाण आहे. ही जात पाण्याचा ताण सहन करण्यास सक्षम आहे. पीक लागवडीनंतर सरासरी 145 ते 160 दिवसात या जातीचे पीक हार्वेस्टिंग साठी तयार होते. म्हणजेच हा एक लवकर येणारा वाण आहे. या जातीच्या कापूस बोंडाचे वजन हे पाच ते साडेपाच ग्रॅम एवढे असते. ही जात रसशोषक किडीसाठी प्रतिकारक असल्याचे आढळून आले आहे.
प्रभात सिड्स कंपनीचे सुपर कॉट : हा देखील वाण राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. राज्यात ज्या ठिकाणी कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते तेथील शेतकरी बांधव या जातीच्या लागवडीला विशेष पसंती दाखवतात. मिळालेल्या माहितीनुसार या जातीच्या कापसाच्या बोंडाचे वजन 5.5 ग्रॅम ते सात ग्रॅम एवढे असते.
कापसाचा हा वाण बागायती भागासाठी उत्तम असल्याचे मत कृषी तज्ञांनी व्यक्त केले आहे. या जातीचे पीक सरासरी 150 ते 170 दिवसात हार्वेस्टिंग साठी तयार होते. विशेष म्हणजे या जातीच्या कापसाची वेचणी खूपच सोपी आहे.
ॲग्री सीड्स कंपनीचे युएस 7067 : कापसाचा हा एक लवकर येणारा वाण आहे. या जातीची लागवड राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते. सरासरी 155 ते 160 दिवसात या जातीचे पीक परिपक्व होत असल्याची माहिती समोर आली आहे.