Cotton Farming : कापूस हे मराठवाडा, विदर्भ अन खानदेशात उत्पादित केले जाणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची दरवर्षी मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. महाराष्ट्र हे कापूस लागवडीच्या बाबतीत देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. पण, उत्पादनाच्या बाबतीत गुजरात राज्याचा प्रथम क्रमांक लागतो.
म्हणजे आपल्या राज्यातील कापसाची उत्पादकता गेल्या काही वर्षांपासून कमी झाली आहे. अशातच यावर्षी महाराष्ट्रात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झालेला नाही. गेल्या जुलै महिन्यात राज्यात जोरदार पाऊस झाला होता मात्र या ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे.
या चालू महिन्यात आत्तापर्यंत सरासरी पेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. अशा परिस्थितीत कापसाच्या पिकावर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. कमी पावसामुळे कापसाच्या उत्पादनात यंदा घट येऊ शकते असं मत व्यक्त केल जात आहे.
दरम्यान आगामी काही दिवसात राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होईल असा अंदाज हवामाना विभागाने नुकताच व्यक्त केला आहे. जर हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली तर निश्चितच कापसाच्या पिकाला यामुळे नवीन जीवदान मिळणार यात शंकाच नाही.
खरंतर सध्या मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश विभागात कापसाचे पीक हे 40 ते 50 दिवसांचे झाले आहे. काही शेतकऱ्यांचे पीक 50 दिवसांपेक्षा अधिक कालावधीचे आहे मात्र बहुतांशी शेतकऱ्यांचे पीक हे 40 ते 45 दिवसांचेच आहेत. अशातच राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आता कापूस पिकाला खताचा दुसरा डोस देण्यास सुरुवात केली आहे.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून कापसाला खताचा दुसरा डोस केव्हा दिला पाहिजे आणि कोणत्या खताचा दुसरा डोस दिला पाहिजे याबाबत प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान आज आपण याबाबत कृषी तज्ञांनी काय माहिती दिली आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कृषी तज्ञांनी कापूस पिकाला दुसरा डोस पिक 40 ते 50 दिवसाचे झाल्यानंतर द्यावा असे सांगितले आहे. तसेच पिकाला पहिल्या डोस मध्ये जे दाणेदार खत वापरले असेल त्या खताचा वापर दुसऱ्या डोसमध्ये करू नये असे सांगितले आहे.
म्हणजेच जर पहिल्या डोस मध्ये 10 26 26 हे दाणेदार खत दिलेले असेल तर दुसऱ्या डोस मध्ये 20 20 0 13 किंवा इतर दाणेदार खत वापरले जाऊ शकते. तसेच दुसऱ्या डोस मध्ये दाणेदार खतासोबतच मॅग्नेशियम सल्फेट अवश्य द्यावे असा सल्ला देण्यात आला असून यासोबतच पावडर फॉर्म मधील पोटॅश देखील वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांनी कापूस पिकासाठी 20 : 20 : 0 : 13 एक बॅग + मॅग्नेशियम सल्फेट 25 kg + पोटॅश 25 किलो ग्रॅम (पावडर पोटॅशच वापरावे). शेतकरी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्ही सुरुवातीला म्हणजेच पहिल्या डोस मध्ये 20 20 0 13 हे दाणेदार खत वापरले असेल तर तुम्ही त्या ऐवजी 10 26 26 वापरू शकता किंवा इतर दाणेदार खत वापरू शकता.