Cotton Farming : महाराष्ट्रात कापूस या नगदी पिकाची खानदेश विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात लागवड ही केली जाते. या विभागा व्यतिरिक्त राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातही अलीकडे कापूस लागवड वधारू लागली आहे. या ठिकाणी विशेष बाब अशी की पश्चिम महाराष्ट्रात केली जाणारी कापूस लागवड तेथील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.
दरम्यान आता राहुरी विद्यापीठाने उन्हाळी कापूस लागवडीला चालना देण्यासाठी एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी गेल्या वर्षापासून कापूस सुधार प्रकल्प राज्यात सुरू केला आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत सोलापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यात उन्हाळी कापूस लागवड केली जाणार आहे.
वास्तविक कापसाचीं आपल्याकडे खरीप हंगामात म्हणजेच पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. मात्र राहुरी विद्यापीठाने उन्हाळी हंगामात कापूस लागवडीसाठी चालना मिळावी या अनुषंगाने गेल्या वर्षीपासून हा प्रकल्प हाती घेतला आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी या प्रकल्पांतर्गत उन्हाळी हंगामात करण्यात आलेली कापूस लागवड तेथील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरली असल्याने याहीवर्षी हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय विद्यापीठाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की विद्यापीठाच्या माध्यमातून आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील यांच्या अनमोल अशा मार्गदर्शनातून या प्रकल्पाअंतर्गत सोलापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यातील जवळपास 500 एकर क्षेत्रावर उन्हाळी हंगामातील कापूस लागवड केली जाणार आहे. यासाठी विद्यापीठाने विकसित केलेले उन्हाळी हंगामातील सुधारित कापसाचे वाण तेथील संबंधित शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
विद्यापीठाच्या माध्यमातून हे वाण शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जातील मात्र याच्या खर्चाचा भार संबंधित शेतकऱ्यांना उचलावा लागणार आहे. मात्र कापूस लागवडीच्या पूर्वीपासून ते काढणीपर्यंत या प्रकल्पा अंतर्गत संबंधित कापूस उत्पादक शेतकऱ्यांना विद्यापीठाचे अनमोल असे मार्गदर्शन लाभणार आहे. यासाठी आटपाडी तालुक्यातील शेतकरी सोबतच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहकार्य लाभणार आहे.
हा प्रकल्प राबविण्यासाठी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी आटपाडी कवठेमहाकाळ या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना लागवड पूर्व मार्गदर्शन केले आहे. यावेळी शेतकऱ्यांना बियाणे देखील उपलब्ध करून देण्यात आले. या प्रकल्पाच्या माध्यमातून उन्हाळी हंगामातील कापूस उत्पादन वाढेल अशी आशा शास्त्रज्ञांनी यावेळी व्यक्त केली. निश्चितच राहुरी विद्यापीठाचा हा प्रयोग उन्हाळी हंगामातील कापूस लागवडीसाठी चालना देणारा सिद्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल.