Cotton Farming : यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होणार आहे. भारतीय हवामान विभागाने तसा दावा केला आहे. हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या देशभरात प्रचंड उष्णता जाणवत असून या उष्णतेमुळे समुद्रातील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होत आहे. हेच कारण आहे की समुद्रावर हवेचा दाब वाढत चालला आहे.
म्हणून यावर्षी मान्सूनचे वेळेआधीच आगमन होण्याची शक्यता आहे. तसेच यंदा चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा जुन ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात भारतात सरासरीपेक्षा अधिकच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
साहजिकच यामुळे खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस लागवड वाढवण्याची शक्यता आहे. दरम्यान जर तुम्हीही यंदा कापूस लागवड करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे.
कारण की, आज आपण कापसाची लागवड कधी केली पाहिजे आणि कापूस लागवड करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कापूस लागवड कधी करावी ?
कापूस हे खरीप हंगामात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. जर तुम्ही यंदा बीटी कापसाची लागवड करू इच्छित असाल आणि पाण्याची, सिंचनाची पुरेशी सोय उपलब्ध असेल तर तुम्ही मे महिन्यातच याची लागवड करू शकता.
पण जर सिंचनाची पुरेशी उपलब्धता नसेल तर पुरेसा मोसमी पाऊस पडला की, मग कापूस पिकाची लागवड करता येऊ शकते. जमिनीची योग्य पद्धतीने मशागत करून, जमीन तयार करून कापूस पिकाची लागवड करावी.
संकरित आणि बीटी वाणांची लागवड करायची असेल तर ओळी ते ओळ आणि रोप ते रोपांमधील अंतर 90 ते 120 सें.मी. आणि 60 ते 90 सें. मी. पर्यंत ठेवले पाहिजे.
सघन कापूस लागवड करण्याचा प्लॅन असेल तर ओळीतल अंतर ४५ सें.मी. आणि रोपांमधलं अंतर १५ सें.मी. एवढं ठेवलं पाहिजे. अशा प्रकारे एक हेक्टरमध्ये 1,48,000 झाडे लावली जातात. बियाणे दर हेक्टरी 6 ते 8 किलोग्रॅम ठेवले जाते. त्यामुळे उत्पादनात 25 ते 50 टक्के वाढ होते.
पेरणीपूर्वी बीजोपचार अवश्य करा
पेरणीच्या वेळी एक हेक्टरसाठी आवश्यक असलेल्या बियांमध्ये 500 ग्रॅम अझोस्पिरिलम आणि 500 ग्रॅम पीएसबी मिसळून बीज प्रक्रिया करा.
बियाण्यांवर पाण्याची प्रक्रिया देखील केली जाऊ शकते, ज्यामुळे 20 किलो नायट्रोजन आणि 10 किलो फॉस्फरसची बचत होत असल्याचा दावा तज्ञांनी केलेला आहे.