Cotton Farming : हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे 31 मे ला मान्सूनचे केरळात आगमन होणार आहे. तसेच महाराष्ट्राच्या मुख्य भूमीत जूनच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी मान्सून आगमन होण्याची शक्यता आहे. एकंदरीत आता मानसून लवकरच राज्यात दाखल होणार आहे. साहजिकच, येत्या काही दिवसात खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस पिकांच्या पेरणीला वेग येणार आहे.
यंदा मान्सून काळात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असल्याने कापूस पीक लागवडीखालील क्षेत्र काहीसे वाढेल असे बोलले जात आहे. कापूस हे राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागातील एक महत्त्वाचे पीक आहे.
अलीकडे पश्चिम महाराष्ट्रात देखील कापसाची बऱ्यापैकी लागवड होत असल्याचे पहावयास मिळत आहे. तथापि कपाशी पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर कपाशीच्या योग्य वाणाची लागवड करणे आवश्यक असते.
यासोबतच पीक व्यवस्थापन देखील महत्त्वाचे असते. या पिकातून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी योग्य वेळी फवारणी करणे आवश्यक असते.
दरम्यान, आज आपण कपाशी पीक लागवडीनंतर पहिली फवारणी कधी करावी ? पहिली फवारणी कोणत्या औषधांची केली पाहिजे ? याविषयी कृषी तज्ञांनी दिलेल्या महत्वपूर्ण माहिती विषयी जाणून घेणार आहोत.
कपाशी पिकात पहिली फवारणी कधी करणार?
कपाशी पिक लागवडीनंतर योग्यवेळी पहिली फवारणी करणे आवश्यक असते. पीक लागवडीनंतर सुरुवातीच्या टप्प्यात रस शोषक किडींपासून पिकाचे संरक्षण करणे आवश्यक असते. कारण की, सुरुवातीच्या टप्प्यात रस शोषक किडींचा कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून आले आहे.
तसेच पिकाची शाकीय वाढ, फुटवा फुटण्यासाठी आणि पांढऱ्या मुळींची वाढ व्हावी यासाठी देखील पहिली फवारणी आवश्यक असते. पहिल्या फवारणीत किडींचा बंदोबस्त व्हावा यासाठी कीटकनाशक देखील घ्यावे लागते.
पहिली फवारणी ही पीक लागवडीनंतर सरासरी 20 ते 25 दिवसात केली जाऊ शकते. या कालावधीत पहिली फवारणी केली तर रस शोषक किडींचा बंदोबस्त होतो शिवाय झाडांची जलद गतीने वाढ होते आणि उत्पादन वाढीसाठी याचा मोठा फायदा होतो.
पहिली फवारणी कोणत्या औषधांची कराल?
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, कपाशी पिकात पहिली फवारणी करताना मीडिया, धानुका (इमिडाक्लोप्रिड 17.8 %) 10 मिली + बायोविटा एक्स, पीएल इंडस्ट्रीज 30 मिली + सिलिकॉन स्टिकर 5 मिली हे सर्व औषध एकत्र मिसळून 15 लिटर पंपात औषध मिक्स करून फवारणी करावी.
या औषधांची पहिली फवारणी केली तर झाडांचा विकास जलद गतीने होतो. किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. तसेच पीक वाढीसाठी पोषक स्थिती तयार होत असते.