Cotton Farming : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पिक आहे. कापसाला पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. याला नगदी पिकाचा दर्जा प्राप्त असून याची लागवड खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात केली जाते. राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात यांसारख्या राज्यांमध्ये कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
कापूस लागवडीच्या आणि उत्पादनाच्या बाबतीत आपला महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक लागतो. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या विभागातील बहुतांशी शेतकरी कापसाचे लागवड करतात.
परंतु, गेल्या वर्षी अनेक भागात गुलाबी बोंडअळी, सुरवातीच्या टप्प्यात कमी पावसामुळं, मान्सूनोत्तर अवकाळी पाऊस आणि प्रचंड उन्हामुळे कापूस पिकाला मोठा फटका बसला होता.
कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली होती. दरम्यान, यंदा चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे यावर्षी कापूस लागवडीखालील क्षेत्र आणखी वाढणार असा अंदाज आहे.
तथापि, कापसाच्या पिकातून जर चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर शेतकऱ्यांनी योग्य वेळी कापसाची पेरणी करणे गरजेचे राहणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण कपाशी लागवड नेमकी केव्हा केली पाहिजे विषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कापूस लागवड केव्हा केली पाहिजे
राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र यासह अनेक भागात एप्रिल महिन्यातच कापसाच्या पेरणीला सुरुवात होते. 20 एप्रिल ते 20 मे या कालावधीत कापसाच्या पेरणीला सुरुवात होते.
पण, कृषी तज्ज्ञांनी मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून कापूस पेरणीला सुरुवात झाली पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. कापसाची पेरणी करताना जर तापमान कमी राहिले तर उत्पादन चांगले येईल, असा तज्ज्ञांचा विश्वास आहे.
कृषी तज्ञ सांगतात की, कपाशीच्या चांगल्या जोमदार वाढीसाठी, या पिकातून चांगल्या उत्पादनासाठी आणि वनस्पतींच्या वाढीसाठी तापमान राखणे फार महत्वाचे आहे.
कापूस पेरणीसाठी १५ जून ते जूनचा शेवटचा आठवडा हा उत्तम काळ असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. मात्र, वेळेवर कापसाची लागवड झाली तरीही गुलाबी बोन्ड अळीचा प्रादुर्भाव कपाशीवर होतोच. परंतु वेळेवर पेरणी केल्यास त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी होतो.
पहिल्या आणि दुसऱ्या वेचणीपर्यंत संपूर्ण कापूस येतो. तिसऱ्या वेचणीत शेतात गुलाबी बोन्ड अळीचा केवळ 5 ते 10 टक्के प्रादुर्भाव दिसून येतो. तथापि, ही समस्या सोडवण्यासाठी शेतकऱ्यांना चिकट सापळे, प्रकाश सापळे इत्यादीचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.