कापसाचे फरदड उत्पादन घेणे योग्य की अयोग्य ? कृषी तज्ञांनी स्पष्टचं सांगितलं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Fardad : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची संपूर्ण राज्यभर शेती केली जाते. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या तीन विभागात या पिकाची सर्वात जास्त लागवड होते.

खानदेशला तर कापूस आगार म्हणून ओळखले जाते. येथील जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे कापसाच्या पिकावर अवलंबित्व आहे. शेतकऱ्यांचे अर्थकारण याच पिकावर अवलंबून असल्याचे चित्र आहे. यावर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात खूपच कमी पाऊस झाला.

मात्र असे असले तरी शेतकऱ्यांनी कापसाच्या पिकावरच यावर्षीही विश्वास दाखवला आहे. कापसाचे पीक आता वेचणीच्या अंतिम टप्प्यात आले आहे. अनेक शेतकऱ्यांची शेवटची वेचणी पूर्ण झाली आहे. यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत कापसाचे पीक शेतातून बाहेर पडणे आवश्यक आहे.

वेचणी पूर्ण झाल्यानंतर कापसाच्या पराट्या शेताबाहेर काढणे आवश्यक असते. मात्र अनेक शेतकरी बांधव थोड्याशा पैशांसाठी कापसाचे फरदड उत्पादन घेतात. कापसाचे उत्पादन घेतल्यानंतर एखाद-दोन पाणी देऊन पुन्हा जे उत्पादन घेतले जाते त्याला कापसाचे फरदड उत्पादन घेणे असे म्हणतात.

दरवर्षी खानदेश, विदर्भ, मराठवाड्यातील बहुतांशी शेतकरी कापसाचे फरदड उत्पादन घेतात. अशा परिस्थितीत अनेकांच्या माध्यमातून कापसाचे फरदड उत्पादन योग्य की अयोग्य असा सवाल उपस्थित केला जात होता. यामुळे जाणकार लोकांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे फरदड उत्पादनामुळे शेतकऱ्यांना हातखर्चाला पैसा उपलब्ध होतो. नवीन पिकासाठी जमिनीची मशागत करावी लागत नाही. आधीच्याच कापूस पिकाला पाणी द्यायचे असते. त्यामुळे फरदड उत्पादनासाठी मेहनत कमी लागते आणि तुलनेने खर्च देखील कमी आहे.

हेच कारण आहे की अनेक शेतकरी कापसाचे फरदड उत्पादन घेत आहेत. पण तज्ञ लोकांनी सांगितल्याप्रमाणे फरदड उत्पादन घेताना कापूस पिकासाठी पुन्हा एकदा नव्याने खत, पाणी आणि कीटकनाशक दिले जाते. परिणामी हे पीक मार्च महिन्यापर्यंत शेतात उभे राहते.

म्हणजेच शेतात अधिक काळ कापसाचे पीक उभे राहते. यामुळे मात्र गुलाबी बोंड अळीला पोषक वातावरण तयार होते. गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम लक्षात घेता कापसाचा हंगाम वेळेवर संपवणे जरुरीचे आहे.

जर कापसाचा हंगाम लांबला तर गुलाबी बोंड अळीला पोषक हवामान तयार होते. याचा परिणाम म्हणून पुढील हंगामात देखील या अळीचा पिकावर प्रादुर्भाव आढळून येतो. त्यामुळे फरदड उत्पादन घेणे टाळावे.

चार पैसे अधिकचे मिळतील म्हणून फरदड उत्पादन घेणे हे पुढील हंगामासाठी घातक ठरू शकते. यामुळे वेळेवर कापसाचा हंगाम संपवून कापसाच्या वावरात जनावरे सोडावीत, शेत पूर्ण मोकळं आणि स्वच्छ करून घ्यावे. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा