Cotton Crop Management : महाराष्ट्रसह संपूर्ण देशभरात कापूस या पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश हे तीन विभाग कापसाच्या शेतीसाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. खरंतर कापूस लागवडीच्या बाबतीत आपले महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर येते.
मात्र जेव्हा उत्पादनाचा प्रश्न येतो तेव्हा महाराष्ट्राचा दुसरा नंबर लागतो. म्हणजे उत्पादनाच्या बाबतीत आपले राज्य पिछाडीवर आहे. राज्यात कापसाची एकरी उत्पादकता खूपच कमी आहे. साहजिकच यामुळे शेतकऱ्यांना या पिकातून अपेक्षित असे उत्पन्न मिळत नाहीये. उत्पादकता कमी होण्याचे अनेक कारणे आहेत. यात मुख्य कारण म्हणजे मर रोग. मर रोगामुळे कापूस पीक शेतकऱ्यांना अलीकडे परवडेनासे झाले आहे.
कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कापूस पिकात दोन प्रकारचा मर रोग असतो. पहिला म्हणजे बुरशीजन्य मर रोग आणि दुसरा प्रकार म्हणजे आकस्मित मररोग. ज्यावेळी जास्तीचा पाऊस पडतो त्यावेळी कापसाच्या पिकात पाणी साचते आणि अधिक काळ पिकात पाणी साचले की तेथे बुरशी तयार होते आणि मग बुरशीजन्य मररोग सुरू होतो. तर दुसरीकडे पावसाचा मोठा खंड पडला आणि नंतर जोरदार पाऊस झाला, किंवा मग पाणी दिले तर पिकावर विपरीत परिणाम होतो, पिकाला झटका बसतो. अशावेळी पिकात आकस्मिक मर रोग सुरू होतो. दरम्यान आज आपण मर रोग थांबवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय केले पाहिजे? याविषयी जाणून घेणार आहोत.
कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतात मररोगाची लक्षणे दिसू लागली की सर्वप्रथम शेतात साचलेले पाणी काढावे. तसेच या रोगाचा प्रादुर्भाव झाला की लगेचच हा रोग नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असते. जर या रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात असेल म्हणजे हा रोग सुरुवातीच्या टप्प्यात जर असेल तर कृषी तज्ञांनी २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रत्येक झाडाला आळवणी करण्याचा सल्ला दिला आहे.
या द्रावणाची प्रादुर्भाव झालेल्या आणि प्रादुर्भाव झालेल्या झाडा शेजारच्या प्रत्येक झाडाला १५० मिली याप्रमाणे आळवणी करण्याचा सल्ला जाणकार लोकांनी दिला आहे. असे केल्यास या रोगावर लवकर नियंत्रण मिळवता येते आणि याचा प्रसार रोखता येतो असे तज्ञ लोक सांगतात. पण प्रादुर्भाव जर जास्त असेल तर प्रत्येक झाडाला याची आळवणी करणे शक्य होणार नाही. शिवाय यासाठी शेतकऱ्यांना जास्तीचा वेळ आणि अधिक पैसा खर्च करावा लागू शकतो.
यामुळे जर कापूस पिकात मर रोगाचा खूपच जास्त प्रादुर्भाव झाला असेल तर अशावेळी २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति १० लिटर पाण्यात मिसळून नॅपसॅक पंपाचे नोझल काढून प्रत्येक झाडाच्या मुळाशी टाकायचे आहे. पण लक्षात ठेवा की या द्रावणाची कोणत्याही परिस्थिती फवारणी करायची नाही. मर लोकांवर कोणत्याच फवारणीचा असर होत नाही. या रोगावर आळवणी करून मात्र नियंत्रण मिळवले जाऊ शकते असे मत काही तज्ञ लोकांनी व्यक्त केले आहे.