Cotton Crop Management : कपाशी हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक नगदी पीक आहे. या पिकाची राज्यभर लागवड केली जाते. हे पीक राज्यातील खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ विभागात मोठ्या प्रमाणात उत्पादित होते. या पिकाला पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. मात्र या पिकाच्या उत्पादकतेत गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात घट आली आहे.
राज्यात कापूस लागवडीखालील क्षेत्र खूपच अधिक आहे. देशात कापूस लागवडीच्या बाबतीत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक विराजमान आहे. परंतु कापूस उत्पादनाच्या बाबतीत राज्याचा दुसरा क्रमांक लागतो. प्रथम क्रमांकावर गुजरातचा नंबर लागतो. याचाच अर्थ आपल्या राज्यात कापसाची उत्पादकता गुजरातपेक्षा कमी आहे. कृषी तज्ञांच्या मते महाराष्ट्रातील कापूस उत्पादकता कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत.
कापूस पिकावर येणाऱ्या वेगवेगळ्या रोगांमुळे आणि कीटकांमुळे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. दरम्यान आज आपण कापूस पिकावर येणारे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे या कीटकांवर एकत्रितपणे कशा तऱ्हेने नियंत्रण मिळवले जाऊ शकते याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं मिळवणार कपाशी पिकावरील किटकावर नियंत्रण ?
कपाशी पिकावर मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे या कीटकांचा प्रादुर्भाव वाढल्यास म्हणजे किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली तर या कीटकांवर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करून नियंत्रण मिळवले जाऊ शकत. पण आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतरच कीटकनाशकांचा वापर करावा. तसेच रासायनिक कीटकनाशकांचा वापर आलटून पालटून करावा म्हणजेच एकच कीटकनाशकाचा वापर वारंवार करणे टाळावे.
कपाशी पिकावरील रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी प्रति दहा लिटर पाण्यात फ्लोनीकॅमीड ५० डब्लूजी किंवा – ३ ग्रॅम किंवा फिप्रोनील ५ एससी किंवा – ३० मिली किंवा बुप्रोफेजीन २५ एससी किंवा २० मिली किंवा थायमिथोक्झाम २५ डब्लूजी किंवा – २ ग्रॅम किंवा ॲसीफेट ५० टक्के + इमिडाक्लोप्रीड १.८ एसपी – २० ग्रॅम किंवा क्लोरोपायरीफॉस ५० टक्के + सायपरमेथ्रीन ५ एसपी- २० मिली या कीटकनाशकाचा वापर करावा. पण कोणत्याही प्रकारचे कीटकनाशक फवारण्याअगोदर तज्ञ लोकांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.