Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वादळी पावसाचे सत्र पाहायला मिळतं आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा विभागात जोरदार पाऊस होत आहे.
वादळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष बाब अशी की, भारतीय हवामान खात्याने आणखी काही दिवस महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट असल्याचे म्हटले आहे.
सध्या राज्यातील निम्म्याहून अधिक जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान, अगदी पावसाळ्यासारखे वातावरण पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे आज तर राज्यातील तब्बल 33 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यातील नऊ जिल्ह्यांमध्ये गारपिट होणार असेही म्हटले गेले आहे.
यामुळे राज्यातील शेतकरी बांधव चिंतेत सापडले आहेत. तथापि या पावसाळी वातावरणामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.
तसेच राज्यातील मराठवाड्यापासून कर्नाटक, केरळ ते कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याचे पाहायला मिळतं आहे. याचा परिणाम म्हणून गेल्या काही दिवसांपासून राज्यात वादळी पाऊस सुरू आहे.
महाराष्ट्रात वादळी पावसासाठी यामुळे पोषक परिस्थिती तयार होत असून आज देखील राज्यात पावसाचा अंदाज आहे. पूर्व मौसमी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असल्याने आज राज्यातील तब्बल 33 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज भर्तवण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तर गारपीट होणार असा अंदाज आहे. दुसरीकडे कोकणासहित संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आता आपण भारतीय हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यांमध्ये गारपीट होणार आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कुठे होणार गारपीट आणि कुठे वादळी पाऊस बरसणार?
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, मराठवाडा विभागातील लातूर, नांदेड, विदर्भ विभागातील अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वाशीम या नऊ जिल्ह्यांमध्ये गारपीटीची शक्यता असून या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दुसरीकडे राज्यातील कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संपूर्ण खान्देश, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उर्वरित मराठवाडा आणि विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.