जून महिन्यात राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने ओढ दिली होती. विशेष म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची विश्रांती पाहायला मिळाली. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती. मात्र,आता गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढू लागला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दृश्य पाहायला मिळते. अशातच, आता भारतीय हवामान खात्याचा एक सुधारित हवामान अंदाज समोर आला आहे. या हवामान अंदाजात भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील संबंधित जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज राज्यातील तब्बल 12 हून अधिक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला असून आगामी तीन दिवस अशीच परिस्थिती कायम राहणार असल्याचे IMD ने स्पष्ट केले आहे.
IMD ने सांगितल्याप्रमाणे, आतापर्यंत उत्तर छत्तीसगड आणि लगतच्या भागात जें कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले होते ते कमी दाब क्षेत्र आता निवळले आहे. याचा परिणाम म्हणून राज्यातील काही भागात पावसाचा जोर ओसरणार आहे. तथापि आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर तसाच कायम राहणार आहे. मुंबईसह उपनगर तसेच कोकण किनारपट्टी भागात पावसाची संततधार कायम राहणार असा अंदाज आहे.
विदर्भात आज पावसाचा जोर थोडासा कमी होणार आहे. तसेच मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडीने आज मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोकणातील रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून या दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. दक्षिण कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याशिवाय, आज मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार आणि विदर्भातील काही भागांसाठी आज येलो अलर्ट देण्यात आला आहे. एकंदरीत गेल्या काही दिवसांपासून ज्या मुसळधार पावसाची वाट पाहिली जात होती त्या मुसळधार पावसाला आता सुरुवात झाली असून यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये मोठे आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शेतकरी राजा पुन्हा एकदा आनंदी झाला आहे. तथापि अजूनही काही भागांमध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.