Business Idea Marathi : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत आले आहेत. नैसर्गिक संकटांमुळे पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. जर समजा नैसर्गिक संकटांचा सामना करून शेतकऱ्यांनी चांगले उत्पादन मिळवले तर उत्पादित झालेल्या शेतमालाला बाजारात अपेक्षित भाव मिळत नाही.
म्हणजे शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होत आहे. सोयाबीनच्या बाबतीत देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. सोयाबीन हे महाराष्ट्रात पिकवले जाणारे एक महत्त्वाचे पीक आहे. याची लागवड राज्यातील मराठवाडा, विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये केली जाते.
मात्र गेल्या काही वर्षांपासून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीन पिकातून फारसे उत्पन्न मिळत नाहीये. अशा परिस्थितीत, जर सोयाबीन उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योग सुरू केला तर त्यांना यातून चांगली कमाई होऊ शकते.
जर शेतकऱ्यांनी सोयाबीनवर प्रक्रिया करून सोया मिल्क आणि सोया पनीर सारखे बाय प्रॉडक्ट तयार केले तर त्यांना याचा चांगला फायदा होणार आहे. दरम्यान आज आपण सोया मिल्क बिझनेस कसा सुरु करायचा ? या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा सुरु करणार सोया मिल्क बिजनेस
या व्यवसायासाठी तुम्हाला शंभर चौरस मीटर पर्यंतची जागा लागणार आहे. तुमच्याकडे स्वतःची जागा नसेल तर तुम्ही भाडेतत्त्वावर जागा घेऊनही हा व्यवसाय सुरू करू शकता. सोया मिल्क तयार करण्यासाठी तुम्हाला सोयाबीन, साखर, आर्टिफिशियल फ्लेवर, सोडियम बायकार्बोनेट आणि पॅकेजिंग मटेरियल लागणार आहे.
या व्यवसायासाठी तुम्हाला सोया मिल्क प्लांट स्थापित करावे लागणार आहे. बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांनी सोया मिल्क बनवण्याचे मशीन तयार केले आहे. अशा कंपन्यांकडून तुम्ही सोया मिल्क बनवण्याचे मशीन खरेदी करून हा सोया मिल्क प्लांट विकसित करू शकता.
किती खर्च करावा लागू शकतो
मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळ स्थित सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ अँग्रिकल्चरल इंजिनिअरिंग आणि दिल्लीतील मेसर्स रॉयल प्लांट सर्व्हिसेस यांनी संयुक्तपणे स्वयंचलित सोया मिल्क बनवण्याचे मशीन विकसित केले आहे. हे मशीन जवळपास दोन लाख रुपये किमतीचे आहे. या मशीनद्वारे अवघ्या एका तासात 100 लिटर सोया मिल्क बनवले जाऊ शकते.
किती कमाई होऊ शकते
सध्या बाजारात सोया मिल्क 120 ते 150 रुपये प्रति लिटर या दराने विकले जात आहे. तसेच सोया पनीर 250 ते 300 रुपयांना विकले जात आहे. विशेष म्हणजे फक्त 60 ते 100 रुपये खर्च करून तुम्ही दहा लिटर पर्यंतचे सोया मिल्क तयार करू शकणार आहात. म्हणजे हा व्यवसाय सुरू करून महिन्याकाठी सहजतेने लाखो रुपयांची कमाई होऊ शकते.