Bullet Train Project : गेल्या काही वर्षांपासून देशातील रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्याकडे शासनाने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. असं म्हणतात की कोणत्याही विकसित देशात तेथील दळणवळण व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावत असते. ज्या देशाची दळणवळण व्यवस्था चांगली राहते त्या देशाचा विकास जलद गतीने होतो.
हेच कारण आहे की, महासत्ता बनू पाहणाऱ्या भारताचा विकास सुनिश्चित करण्यासाठी आता रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रेल्वे वाहतूक सक्षम असावी म्हणून वंदे भारत एक्सप्रेस सारख्या हायस्पीड ट्रेन देखील सुरू झाल्या आहेत.
देशातील विविध मार्गांवर भारतीय रेल्वेकडून वंदे भारत एक्सप्रेस चालवली जात आहे. सध्या स्थितीला देशातील 34 महत्त्वाच्या मार्गावर या संपूर्ण भारतीय बनावटीच्या गाडीचे संचालन सुरू झाले आहे. देशातील विविध राज्यांना वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे.
वंदे भारत एक्सप्रेसनंतर आता बुलेट ट्रेनचे देखील जाळे तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या मुंबई ते अहमदाबाद दरम्यानच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना जलद कनेक्टिव्हिटी देणारा हा प्रकल्प दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम जलद गतीने सुरू आहे. 2026 पर्यंत या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू होऊ शकतो असा दावा केला जात आहे.
दरम्यान देशाच्या आर्थिक राजधानीला बुलेट ट्रेनची भेट मिळाल्यानंतर आता राष्ट्रीय राजधानीला देखील बुलेट ट्रेनची भेट मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली ते हावडा दरम्यान बुलेट ट्रेन चालवली जाणार आहे.
यासाठी NHSRCL म्हणजेच नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने बुलेट ट्रेनचा मार्ग जारी केला आहे. दिल्ली ते हावडा बुलेट ट्रेन बिहार मार्गे जाणार आहे. या बुलेट ट्रेन मार्गावर बिहार येथे बक्सर, उदवंतनगर (आरा), पाटणा आणि गया या ठिकाणी बुलेट ट्रेनचे स्टेशन तयार होणार आहेत.
या चार ठिकाणांसाठी बुलेट ट्रेनच्या मार्गाचे हवाई सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षण करणारी संस्था गेल्या तीन दिवसांपासून आता आरामधील जमिनीवरील सर्वेक्षण करण्यात व्यस्त आहे.
जमिनीवरील सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर मग या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमीनीचे भूसंपादन केले जाणार आहे. यानंतर मग या प्रकल्पाचे काम सुरू होईल अशी माहिती समोर आली आहे.
निश्चितच हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बिहारवासीयांना दिल्लीकडील आणि पश्चिम बंगालकडील प्रवास जलद गतीने करता येणार आहे. या मार्गावर ताशी 350 किलोमीटर वेगाने बुलेट ट्रेन धावणार आहे. यामुळे दिल्ली ते हावडा हा प्रवास गतिमान होणार आहे.