Buffalo Farming : भारतात फार पूर्वीपासून म्हैस पालन हा व्यवसाय केला जात आहे. शेतकरी बांधव शेतीला जोड व्यवसाय म्हणून म्हैस पालनाचा व्यवसाय करत असतात. हा व्यवसाय प्रामुख्याने दुधासाठी केला जातो. यामुळे शेतकरी बांधव अधिक दूध उत्पादन असलेल्या म्हशीच्या जातींचे संगोपन करतात.
अशा परिस्थितीत आज आपण महाराष्ट्रातील हवामानात तग धरणाऱ्या म्हशीच्या काही प्रमुख जातींची माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मेहसाना म्हैस : भारतात आढळणारी म्हशीची ही एक प्रमुख जात आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील काही शेतकरी बांधव या जातीच्या म्हशीचे पालन करत आहेत. म्हशीची ही जात अधिक दूध उत्पादनासाठी ओळखली जाते.
ही म्हैस एका वेतात सरासरी 3000 लिटर पर्यंत दूध देण्यास सक्षम असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. यामुळे अधिक दूध उत्पादनासाठी या जातीच्या म्हशीचे संगोपन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
मुऱ्हा : ही देखील भारतात आढळणारी म्हशीची एक प्रमुख जात आहे. या क्षेत्रातील जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतात, तसेच महाराष्ट्रात या जातीचे मोठ्या प्रमाणात संगोपन केले जात आहे. या म्हशीचे शरीर बांधा मोठा, भारदस्त व कणखर असतो.
ही म्हैस एका वेतात 3000 ते 3500 लिटर पर्यंत दूध देण्या सक्षम असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. या जातीच्या म्हशीच्या दुधात फॅटचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पशुपालकांसाठी म्हशीची ही जात फायदेशीर ठरू शकते.
सुरती : जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे या जातीची म्हशीची जात ही अधिक दूध उत्पादनासाठी ओळखली जाते. तथापि या जातीच्या म्हशीचे दूध उत्पादन हे मुऱ्हा आणि मेहसाणा जातीपेक्षा कमी असते.
महाराष्ट्रातील हवामान या जातीच्या म्हशीसाठी अनुकूल आहे. या म्हशीचा शरीर बांधा मध्यम, डोळे लांबट, भुवयांचे केस पांढरे, डोके मोठे, शिंगे मध्यम व विळ्याच्या आकाराची असतात.
या म्हशीचा रंग भुरा व मानेवर ठळक पांढरे आडवे पट्टे असतात. म्हशीची ही जात एका वेतात एक हजार आठशे लिटर पर्यंत दूध देण्यास सक्षम असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे.
पंढरपुरी : म्हशीची ही जात महाराष्ट्रातील हवामानातं तग धरते. पंढरपूर व आजूबाजूच्या परिसरात या जातीचे मोठ्या प्रमाणात संगोपन केले जात असल्याने या जातीला पंढरपुरी असे नाव पडले आहे. या जातीची म्हैस एका वेतात 1500 ते 1800 लिटर एवढे दूध उत्पादन देण्यास सक्षम आहे.