Brinjal Farming : महाराष्ट्रात फार पूर्वीपासून पारंपारिक शेती केली जात आहे. सोयाबीन, कापूस, कांदा इत्यादी पिकांची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या पारंपारिक पिकांसोबतच आपल्या महाराष्ट्रात भाजीपाला वर्गीय पिकांची देखील मोठ्या प्रमाणात लागवड होते. राज्यातील अनेक शेतकरी बांधव तरकारी पिकांची लागवड करून चांगली कमाई करत आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील वांगी या भाजीपाला लागवडीतून चांगली कमाई करून दाखवली आहे. जिल्ह्यातील चंदगड या दुर्गम भागातील तालुक्यातील कल्याणपूर येथील अमृत पाटील या प्रयोगशील शेतकऱ्याने अवघ्या 16 गुंठे जमिनीत वांग्याची लागवड करून तब्बल 80 हजाराची कमाई केली आहे.
यामुळे सध्या या शेतकऱ्याची संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या वांग्याच्या प्लॉटमधून त्यांना आणखी एक महिना उत्पादन मिळणार आहे. परिणामी, कमाईचा हा आकडा आणखी 20 हजारापर्यंत वाढू शकतो आणि एक लाख रुपयांपर्यंत त्यांना कमाई होऊ शकते असे म्हटले जात आहे.
विशेष म्हणजे अमृत पाटील यांनी उत्पादित केलेली वांगी बेळगाव मार्केटमध्ये कल्याणपुर वांगी या नावाने विकली जात आहेत. खरेतर मौजे कल्याणपूर हे वांग्याच्या उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे.
या गावातील अनेक शेतकरी बांधव वांग्याची आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत आणि चांगले उत्पन्न मिळवत आहेत. मात्र अलीकडील काही वर्षांमध्ये या गावातील शेतकरी बांधव उसाची मोठ्या प्रमाणात शेती करत असल्याचे चित्र आहेत.
याचे कारण म्हणजे गावातील शेतकऱ्यांना आता शाश्वत पाणी उपलब्ध झाले आहे. परंतु अमृत पाटील यांनी ऊस पिकाला फाटा दिला आणि पर्यायी पीक म्हणून वांग्याची लागवड करून चांगली कमाई करून दाखवली आहे.
यामुळे त्यांच्या गावात त्यांच्या आधुनिक वांग्याच्या शेतीची सध्या चर्चा आहे. अमृत पाटील यांनी मांजरी जातीच्या वांग्याची लागवड केली आहे. त्यांनी एक डिसेंबरला वांग्याची लागवड केली होती. त्यांनी गादीवाफ्यावर लागवड केली आहे आणि आता गेल्या महिन्याभरापासून त्यांना या पिकातून उत्पादन मिळू लागले आहे.
ते एका आठवड्यातून दोनदा वांग्याची हार्वेस्टिंग करत आहेत. या पिकासाठी त्यांनी खूपच कमी खर्च केला असून त्यांना आत्तापर्यंत 80 हजाराचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे आणखी एक महिना त्यांना यातून उत्पादन मिळणार असल्याने वांगीच्या पिकातून जवळपास एक लाख रुपयांची कमाई त्यांना होणार आहे.
निश्चितच पाटील यांनी अर्ध्या एकर पेक्षा कमी जमिनीत लागवड केलेल्या वांगी पिकातून एक लाख रुपयांची कमाई करून इतरांसाठी मार्गदर्शक असे काम केले आहे. त्यांचा हा प्रयोग परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठी देखील मार्गदर्शक ठरणार आहे.