Black Soybean Farming : सोयाबीन हे महाराष्ट्रातील एक मुख्य पीक आहे. याची लागवड ही खरीप हंगामात केली जाते. आपल्या राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये सोयाबीनची लागवड केली जात असते.
मिळालेल्या माहितीनुसार, देशातील एकूण सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांचा 85% एवढा वाटा आहे. महाराष्ट्रात देशाच्या एकूण उत्पादनापैकी 40% एवढे उत्पादन घेतले जाते आणि मध्यप्रदेशमध्ये एकूण उत्पादनापैकी जवळपास 45 टक्के एवढे उत्पादन घेतले जाते.
याशिवाय राजस्थान या राज्यातही मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादन घेतले जाते. खरतर आपल्याकडे पिवळ्या सोयाबीनची मोठ्या प्रमाणात शेती होत असते. तुम्हीही पिवळे सोयाबीन पाहिले असेल.
मात्र, आज आपण काळ्या सोयाबीन बाबत माहिती पाहणार आहोत. कदाचित तुम्ही काळे सोयाबीन पाहिले नसेल मात्र उत्तराखंड या राज्यात काळे सोयाबीन लावले जाते.
तेथील शेतकरी काळ्या सोयाबीनची लागवड करतात. विशेष म्हणजे उत्तराखंडमध्ये उत्पादित होणाऱ्या या विशेष सोयाबीन जातीमधून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.
काळे सोयाबीन मध्ये औषधी गुणधर्म आढळत असल्याने मानवी आरोग्यासाठी याचे सेवन फायदेशीर ठरते. अशा परिस्थितीत याला बाजारात मोठी मागणी असते. विशेष म्हणजे या काळ्या सोयाबीनला अधिकचा भाव मिळतो.
काळे सोयाबीन काय भावात विकले जाते ?
बाजारात पिवळे सोयाबीन 4,400 रुपये प्रति क्विंटल या दरात विकले जात आहे. म्हणजेच एक किलो पिवळे सोयाबीन 44 रुपयाच्या आसपास बाजारात उपलब्ध आहे. दुसरीकडे, बाजारात काळे सोयाबीन खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे.
याचा परिणाम म्हणून त्याला बाजारात अधिकची मागणी पाहायला मिळते आणि बाजार भाव देखील अधिकचा मिळतो. काळे सोयाबीन 120 रुपये प्रति किलो या भावात विकले जात आहे.
म्हणजे पिवळे सोयाबीनपेक्षा या काळे सोयाबीनला अनेक पटीने वाढीव भाव मिळतो. यामुळे या काळ्या सोयाबीनची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. आता आपण काळे सोयाबीनचे बियाणे कुठे मिळणार ? याविषयी माहिती पाहणार आहोत.
बियाणं कुठं मिळणार ?
मीडिया रिपोर्ट नुसार, केंद्र सरकारच्या शेतकरी कृषी व्यवसाय संघाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तेथे असणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून काळे सोयाबीन बियाणे खरेदी केले जाऊ शकते.