रीप हंगामाच्या तोंडावर राज्यात महाबीजच्या सोयाबीन बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. महाबीजकडून राज्याला गेल्या वर्षी केलेल्या सोयाबीन बीज पुरवठ्याच्या तुलनेत यंदा निम्म्याहून कमी बियाणे उपलब्ध करून दिले आहेत.
त्यातही आतापर्यंत सुमारे ४२ हजार क्विंटल बियाणे बाजारात आणले गेले आहे. समर सीड प्रॉडक्शन मिळून यंदा केवळ ६५ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची उपलब्धता होणार आहे.
त्यामुळे सोयाबीन बियाणे टंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. विश्वासाचे बियाणे म्हणून शेतकरी मोठ्या आशेने महाबीजच्या बियाण्यावर अवलंबून असतो.
मात्र गेल्या काही वर्षांपासून महाबीजकडून शेतकऱ्यांचा विश्वास घात होताना दिसत आहे. बोगस बियाणे आणि सोयाबीन बियाण्याच्या टंचाईवरून महाबीज चर्चेत राहत आहे.
यंदाही सोयाबीन बियाण्याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. अशात दोन वर्षांपूर्वी महाबीजने चक्क बाजार समितीतून बियाणे विकत घेतले.
महाबीजच्या पिशव्यांमध्ये पॅकिंग करून शेतकऱ्यांना विकले, असा दावा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नुकताच केला. त्यामुळे महाबीजच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण होत आहे.
यंदा मागणीच्या तुलनेत अत्यल्प बियाणे बाजारात उपलब्ध असल्याने आता शेतकऱ्यांची फरफट होणार आहे. शेतकऱ्यांना पाहिजे तेवढे खात्रीशीर बियाणे कमी किमतीत उपलब्ध करून देणे ही महाबीजची जबाबदारी आहे.
ऐन पेरणीच्या वेळी कारणे सांगून महाबीज हात झटकू शकत नाही. बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी महाबीजकडे अनेक पर्याय होते. मात्र महाबीज नापास झाले आहे.
यामागचे कारणे शोधण्याची गरज आहे. दुसरीकडे महाबीजचे बियाणे दिवसेंदिवस महाग होत आहे. त्यामुळे महाबीजला महाग बियाणे महामंडळ म्हणण्याची वेळ आली असल्याचे शेतकरी संघटनेचे नेते अविनाश नाकट यांनी म्हटले आहे.
गेल्या वर्षीच्या बीज निर्मिती कार्यक्रमाच्या वेळी सप्टेंबर ते ऑक्टोबर या पीक परिपक्व होण्याच्या काळात पाऊस झाल्यामुळे बियाणे नापास होण्याचे प्रमाण अधिक आहे.
त्यामुळे बियाणे निर्मितीवर परिणाम होऊन उपलब्धता कमी झाली आहे. बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या तपासणीतही मोठ्या प्रमाणावर बियाणे नापास झाले आहेत. त्याचा परिणामदेखील झाला आहे. – प्रकाश ताटर, महाव्यवस्थापक, विपणन महाबीज.