Mumbai Ahmedabad Bullet Train : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे वाहतूक सुधारण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. देशातील रेल्वे वाहतूक आधीच्या तुलनेत अधिक सक्षम झाली आहे. रेल्वे प्रवाशांचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी शासनाने वंदे भारत एक्सप्रेस सारखी हायस्पीड ट्रेन सुरू केली आहे.
सध्या या ट्रेनचा प्रवाशांमध्ये मोठा बोलबाला पाहायला मिळत आहे. या ट्रेनमुळे प्रवाशांचा प्रवास जलद झाला असून या गाडीला चांगला प्रतिसाद दाखवला जात आहे. विशेष बाब म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस नंतर आता 320 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम असणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे देखील लवकरच काम पूर्ण होणार आहे.
मुंबई ते अहमदाबाद दरम्यान देशातील पहिली बुलेट ट्रेन सुरू होणार आहे. सध्या या 508 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या प्रकल्पाच्या गेल्या काही दिवसांपासून विशेष चर्चा पाहायला मिळत आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील या प्रकल्पासंदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी एक मोठी अपडेट दिली होती.
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड संस्थेच्या माध्यमातून बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम पूर्ण केले जात असून याच संस्थेने आता या प्रकल्पासंदर्भात एक नवीन अपडेट दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पा अंतर्गत पालघर जिल्ह्यात 100 खांबांची पायाभरणी पूर्ण करण्यात आली आहे.
एवढेच नाही तर या प्रकल्प अंतर्गत विकसित ठाणे, बोईसर आणि विरार येथील स्थानकांच्या कामांना सुद्धा आता वेग आला आहे. यासह पूल व डोंगरातील बोगद्यांच्या कामांनाही वेग आला आहे. त्यामुळे देशातील पहिली बुलेट ट्रेन नियोजित वेळेतच प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
यामुळे भविष्यात मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास आणखी गतिमान होणार आहे. या देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत सात नद्यांवर पुल तयार होणार आहेत. यातील वल्साड, नवसारी, खेड या जिल्ह्यांतील कामे पूर्ण झाली आहेत. तसेच, नर्मदा, तापी, माही आणि साबरमती या नद्यावरील पुलाची कामे सुद्धा सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत.
या प्रकल्पातील १२ स्थानकांची कामे सुरू आहेत, ही कामे बांधकामाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आली आहेत. ट्रॅकचे कामही सुरू झाले असून, गुजरात राज्यात ३०० किलोमीटर मार्गावरील खांबांचे काम आणि 160 किलोमीटर मार्गावरील व्हायडकटचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पहिला टप्पा 2026 पर्यंत होईल आणि प्रवाशांना 2026 मध्ये बुलेट ट्रेनने प्रवास करता येईल अशी आशा व्यक्त होत आहे.