Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस होत आहे. खरंतर राज्यात 17 ऑगस्ट पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्याआधी 8-9 दिवस पावसाने दडी मारलेली होती. आठ-नऊ दिवस महाराष्ट्रात कुठेच पाऊस झाला नाही यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत होती.
गेल्या वर्षी सारखीच परिस्थिती तर तयार होणार नाही नां अशी भीती शेतकऱ्यांना होती. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस झाला आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने 25 ऑगस्ट पर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मुंबई, पुण्यात पुढील 72 तास जोरदार पाऊस होणार असा अंदाज आयएमडीने दिला आहे. विशेष म्हणजे सध्या सुरू असणारा पाऊस हा तर फक्त ट्रेलर आहे. कारण की पावसाची तीव्रता येत्या काही दिवसांनी आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे पावसाचा खरा पिक्चर रिलीज होणे अजून बाकी आहे असं आपण म्हणू शकतो.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 21 ऑगस्ट रोजी अर्थातच आज सर्वदूर पाऊस हजेरी लावणार आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्यातील सर्वच्या सर्व 36 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे आगामी चार दिवस अर्थातच 25 ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार आहे.
तसेच राज्यात २५ ऑगस्टपासून हवेचा दाब अनुकूल होणार आहे. हवेचे दाब सध्या १००५ ते १००६ हेक्टा पास्कल इतका आहे. पण २५ पासून हा दाब १००० च्या खाली येणार आहे, त्यामुळे केरळ ते गुजरात भागात पुन्हा एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय होणार असा अंदाज आहे. याचा परिणाम म्हणून 25 ऑगस्ट पासून ते 12 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.
या काळात मान्सून अधिक वेगाने सक्रिय होणार आहे. त्यामुळे पावसाचा जोर आणखी वाढू शकतो असे म्हटले जात आहे. एकंदरीत राज्यात 25 ऑगस्ट पासून पावसाचा जोर आणखी वाढणार असे जाणवत आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी आणि शेतीमधील आवश्यक कामे लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावीत असा सल्ला दिला जात आहे.